जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:28 PM2019-02-21T15:28:14+5:302019-02-21T15:28:46+5:30

पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा ...

Just ashamed, shame ...! | जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...!

जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...!

googlenewsNext

पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा पराक्रम, त्याग नागरिकांच्या मनापर्यंत फारसा पोहोचायचा नाही. त्यात आपल्या गावातला पोरगा सैन्यात म्हणजे तो काय लढाई करणार? ही मानसिकता चालत आलेली. ‘घर की मुर्गी, दाल बराबर’ असंच असतं ना!

आपल्या गावातला तरुण सैन्यात भरती झाला असला तरी तो तिथं भटारखान्यात काम करीत असणार एवढी तुच्छ मानसिकता काही वर्षांपूर्वीपर्यंत अनुभवायला मिळत होती. जेव्हा कारगिल युद्ध झालं अन् गावागावांतले भारतमातेचे सुपुत्र शहीद झाले तेव्हा कुठं या मानसिकतेला जबरदस्त चपराक बसली. आपल्या भागातले जवानही प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढतात, याची साक्ष त्याच्याच मृतदेहाला द्यावी लागली होती. आज तर काय, रोजचंच युद्ध! दहशतवाद्यांच्या गोळ्या रोज आपल्या जवानांच्या छातीत घुसताहेत. देशातला नागरिक सुरक्षित राहावा यासाठी हे जवान छातीवर गोळ्या झेलतात, पण त्याच देशातले सुरक्षित असणारे नागरिक त्यांचा किती आदर करतात, हे तपासून पाहायलाच हवे! सैन्यातून निवृत्त झालेले जवानही आज या शत्रूंवर चाल करून जाण्यास उत्सुक आहेत. हे असतं खरंखुरं देशप्रेम! आपल्या नागरिकांतही देशप्रेम ठासून भरलेलं आहे, पण याच देशात सैनिकांचा सन्मान न करणारे लोकही मूठभर का होईना पण आहेतच की!

अतिरेकी हल्ल्यात आपला एखादा जवान शहीद झाला की, अनेकांना देशप्रेम आठवतं. भूकंपासारखी मोठी आपत्ती आली की, मदतीसाठी सैनिक आठवतो. आपल्या प्रत्येक श्वासासोबत असणाºया सैनिकांसाठी आपण काय करतो हो? एरवी या जवानांबद्दल आपण आपला आदर कृतीतून कितपत व्यक्त करतो हो? जवान आपल्या पत्नीला, लहान मुलांना गावी ठेवून शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्याची तयारी करून जातो ते तुमच्या-आमच्या रक्षणासाठी गावाकडे असणाºया त्याच्या कुटुंबाच्या सामान्य अडचणीत तरी आपण कितपत मदतीला जातो? ‘जय जवान जय किसान’च्या घोषणा देत ‘अमर रहे’च्या घोषणाही देण्याची वेळ येते. एका पत्नीचा नवरा जातो, लहान बालकांचा बाप जातो, म्हाताºया आईचा आधार जातो. असं सगळेच गेलेलं असतं त्या कुटुंबाचं!

भारतमातेच्या एका सुपुत्राचं बलिदान गेलेलं असतं. जवान युद्धभूमीवर असतानाही गावात त्याच्या कुटुंबाला त्रास देणं, त्याची जमीन हडपणे असे प्रकार नाहीत का घडत? चांगलं नागरिक बनता आलं तरी देशासाठी खूप काही केल्यासारखं आहे. प्रत्यक्ष लढाईच केली पाहिजे असं कुठंय? चांगलं नागरिकच बनता येत नसलं तर काय अर्थ आहे हो मेणबत्त्यांचा अन् घोषणा देण्याचा? गावाकडे सुट्टीवर आलेल्या जवानांचा साधा आदर करता येत नसेल तर कशाला हव्यात या गप्पा? भ्रष्टाचार हा सुद्धा एक देशद्रोहच नाही का? तिकडे जवान आपल्या प्राणाची आहुती देतात अन् इकडं भ्रष्टाचारानं देश खिळखिळा केला जातो. अशा गिधाडांच्या रक्षणासाठी जवानांनी आपले बळी द्यावेत काय? भ्रष्टाचार हा केवळ पैशांचाच होतो असे नाही, कुठलाही भ्रष्ट आचार हाच तर भ्रष्टाचार ना! या देशाचे कायदे पाळण्यापेक्षा ते मोडणारेच दिसू लागलेत. साधे वाहतुकीचे नियम तरी किती पाळतो हो आपण? आपलं हे वागणं देशाला अभिप्रेत असतं काय? किती जण स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी असतात हो?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा इथं दहशतवाद्यांनी भारतमातेच्या सुपुत्रांवर हल्ला केला. देशाच्या काळजात आकांत अन् डोळ्यात अंगार फुलला. शहिदांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी काही हात पुढे सरसावले. सुरतच्या एका व्यापाºयानं तर आपल्या मुलीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रद्द करून शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अकरा लाखांची मदत दिली. सव्वाशे कोटींच्या देशात बोटांवर मोजावे एवढेच दानवीर? लग्न सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणारे अन् डान्स बारमध्ये नोटांची मुक्त उधळण करणारे कुठं गेलेत? ज्यांच्या जिवावर आपण मोकळा श्वास घेतोय त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची काही भावना? अरे, मदत राहू द्या!

तुमच्या मदतीची वाट नाही पाहत त्यागी जवानाचं स्वाभिमानी कुटुंब! किमान जवानांचा आदर तरी करा. पुलवामातल्या दुर्दैवी घटनेनं सारा देश रडतो आहे आणि इकडं बारामतीच्या पोलिसांनी शोकसभेची परवानगी मागण्यासाठी आलेल्या सीआरपीएफच्या अशोक इंगवले या जवानाला बेदम मारहाण केल्याची, त्यांच्यासोबतच्या निवृत्त जवानाला धक्काबुक्की केल्याची बातमी येतेय! तुमच्यासाठी रक्त सांडणाºयांचंही रक्तअसं हिसकावून घेता? हाच का आपल्या जवानांचा आपल्याकडून होत असलेला आदर? हा आदरही करता येत नसेल तर बंद करा त्या घोषणा! विझवा त्या मेणबत्त्या! ए मेरे वतन के लोगों, जरा शर्म करोऽऽ, शर्म करो..!
  -अशोक गोडगे-कदम
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक अन् अभिनेते आहेत) 

 

Web Title: Just ashamed, shame ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.