ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:58 AM2019-04-16T09:58:02+5:302019-04-16T10:36:09+5:30

प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे.

The great literary Prof. G. M. Pawar passed away | ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन

googlenewsNext

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचे आज पहाटे सोलापूर येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी साडेचार वाजता राहत्या घरातून भगवंत हाऊसिंग सोसायटी विजापूर रोडपासून निघणार आहे. तसेच पाच वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, निधनाचे वृत्त समजताच राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गो. मा. पवार यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.


डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय
प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे. प्रा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण मध्ये झाले. मराठी विषयातून एम. ए. चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात ३३ वषे सेवा केली. यात शासकीय महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेही अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून विपूल साहित्य निर्मिती केली.


पुस्तके
विनोद – तत्व व स्वरूप
मराठी विनोद – विविध अविष्काररूपे
निवडक फिरक्या
निवडक मराठी समीक्षा
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – जीवन व कार्य
निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – भारतीय साहित्याचे निर्माते
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २
द लाईफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
इ. पुस्तके लिहिली अथवा संपादित केली.


पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली
भैरू रतन दमाणी पुरस्कार सोलापूर
शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडी
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार , वाई
पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर
महाराष्ट्र फौंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार,
धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, औरंगाबाद
शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार सोलापूर
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबाद

मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सिद्धांतिक मीमांसा करणारे प्रा. गो. मा. पवार हे पहिले व एकमेव समीक्षक आहेत. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर २२ विद्यार्थ्यांनी एम.फीलची पदवी प्राप्त केली आहे.

Web Title: The great literary Prof. G. M. Pawar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.