चांगले पाहा, चांगले ऐका, चांगले वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:50 PM2019-03-15T12:50:18+5:302019-03-15T12:51:13+5:30

हा लेख लिहिताना गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे सांगतात वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू ...

Good, see good, listen good | चांगले पाहा, चांगले ऐका, चांगले वाचा

चांगले पाहा, चांगले ऐका, चांगले वाचा

Next
ठळक मुद्देइंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शनवरून चोवीस तास माहितीचा महापूर‘चांगले पहा’, ‘चांगले ऐका’, ‘चांगले वाचा’. याची सुरुवात आपण स्वत:पासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आवश्यक बनलं आहे

हा लेख लिहिताना गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे सांगतात वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. गांधीजींच्या विचारांचा योग्य तो सन्मान ठेवून मला आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जेथे की दृकश्राव्य माहितीचा सर्वत्र  भडीमार होत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शनवरून चोवीस तास माहितीचा महापूर वाहत आहे, जो आपण इच्छा असूनही टाळू शकत नाही. म्हणूनच नमूद करावेसे वाटते आवर्जून ‘चांगले पहा’, ‘चांगले ऐका’, ‘चांगले वाचा’. याची सुरुवात आपण स्वत:पासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आवश्यक बनलं आहे.

चांगले पाहा - आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही पाहत असतो. आपण काय पाहतोय याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. पण आजच्या काळात वाईट पाहणे आपण टाळू शकतो का?  हे सर्व बंद करणे देखील आजच्या काळात शक्य नाही. तर मग आपल्या हातात काय उरते?  ते म्हणजे चांगले पाहणे व आपल्या पाल्याला आवर्जून चांगले पाहायला  लावणे. आपल्या गावात चांगले चित्र प्रदर्शन लागले असेल, शिल्प प्रदर्शन असेल, बोध देणारा चित्रपट लागला असेल, एखादे चांगले नाटक असेल,  प्राणी संग्रहालय असेल, पुरातन वस्तूंचे संग्रहालय असेल, सायन्स सेंटर असेल, योग शिबीर असेल, खेळाच्या स्पर्धा असतील, पुरातन मंदिर असेल येथे आपण जातो का ?  मुलांना घेऊन जातो का ? नसेल तर चांगले काय आणि वाईट काय याचा फरक त्यांना कसा कळणार?.  तर याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपण सहलीसाठी महाराष्ट्रातील किल्ले, वेरुळ अजिंठ्याची लेणी , कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र, हेमकलसा,  सावरकरांना जिथे शिक्षा झाली असे अंदमान ही ठिकाणं निवडून येथे जाऊन व ती ठिकाणे पाहून नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो व मुलांना ती देऊ शकतो तसेच महाराष्ट्रातील आध्यात्मिक मंदिरांना भेटी देऊन मुलांना अध्यात्माची कास धरायला लावणे आजच्या काळात गरजेचे आहे. एकदा चांगले पाहण्याची दृष्टी सजग झाली की वाईट जरी एखाद्यावेळेस नजरेसमोर आले तरी त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होणार नाही.

चांगले ऐका- दिवसभर आपण खूप काही ऐकत असतो. वाहनांचे कर्कश आवाज, रेडिओवरील जाहिरातींचे आवाज, लग्न-समारंभ व इतर सभारंभामध्ये लावलेले रद्दड गाण्यांचे आवाज, टवाळखोर व्यक्तींच्या  शिव्यांचे आवाज हे आपल्या कानांवर इच्छा नसताना देखील आदळत असतात. हे जर टाळायचे असेल तर आपल्याला यावर एकच उपाय म्हणजे चांगले ऐका. चांगले संगीत ऐका, चांगली गीते ऐका, नाट्य संगीत ऐका. समज असणाºया पाल्याला आपल्या गावात  होणाºया वेगवेगळ्या विषयावरील बौद्धिक  व्याख्याने, धार्मिक प्रवचने, कविसंमेलने  यांना घेऊन जा. मान्यवरांची व्याख्याने, नामवंतांच्या मुलाखती तरुणांनी आवर्जून ऐकल्या  पाहिजेत. ‘चांगला कान तयार करणे’ हे फक्त आणि फक्त आपल्याच  हातात आहे.

चांगले वाचा - कोणीतरी म्हटले आहे ‘वाचाल  तर  वाचाल’. पण आपण काय वाचतो हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. रोजच्या वर्तमानपत्रातील खून, दरोडे, घोटाळे, बलात्कार, अपघात यावरील बातम्या वाचून आपण तरुन जाऊ शकू का? तर याचे उत्तर आहे कदापि नाही. आपल्या जीवनाला दिशा द्यावयाची असेल तर चांगले वाचणे गरजेचे आहे. लहान मुलांना दैनंदिन वर्तमानपत्रातून येणाºया बोधकथा, प्रेरणा देणारे लेख, विज्ञानावरील लेख व तंत्रज्ञानावरील लेख आवर्जून वाचण्यास सांगणे गरजेचे आहे.  यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडू शकेल. आलतूफालतू वाचण्यात आपला बहुमोल वेळ वाया घालवणार नाहीत.

तर आजच्या काळात चांगले पाहणे, चांगले ऐकणे, चांगले वाचणे आवश्यक झालेले आहे. त्यासाठी आवर्जून वेळ देणे गरजेचे आहे तरच वाईटापासून आपली सुटका होऊ शकेल. तर असे चांगले पाहिलेले, ऐकलेले  आणि  वाचलेले अनुभव आपण इतरांना देखील सांगणे आवश्यक आहे. विचारांचा पाया उत्तम असलेला व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकेल त्यास यशाचा मार्ग गवसेल. पण सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागणार आहे. चला तर मग आजपासूनच एक संकल्प करूया चांगलं पाहूया, चागलं ऐकूया, चांगलं वाचूया तेही आवर्जून.
-महेश भा. रायखेलकर
(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.)  

Web Title: Good, see good, listen good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.