शाळा-महाविद्यालयातून हवे निसर्ग शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:01 PM2019-04-24T13:01:12+5:302019-04-24T13:01:30+5:30

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल.

Education and education from school-college! | शाळा-महाविद्यालयातून हवे निसर्ग शिक्षण !

शाळा-महाविद्यालयातून हवे निसर्ग शिक्षण !

Next

दिवसेंदिवस मानवाचं निसर्गावरचं कमी होत जाणारं प्रेम आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक होत असलेलं दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी मानवालाच शापित ठरणार आहेत. निसर्गापासून दूर जाण्याची मानवाची वृत्तीच या जागतिक आणि प्रादेशिक पर्यावरणीय समस्येला कारणीभूत आहे. क्षणाक्षणाला कमी होत असलेला ओझोनचा थर आणि वाढत चाललेले प्रदूषण, त्याचप्रमाणे संपत जाणारे जमिनीतील पाण्याचे साठे आणि निसत्व होत असलेली शेतजमीन, या आणि अशाप्रकारच्या अनेक समस्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत. या साºया समस्यांचं एकच उत्तर, पर्यावरण संवर्धन !

आपलं सारं जीवन ज्या निसर्गावर अवलंबून आहे त्या निसर्गाकडे आपण पाठ फिरवणे कितपत योग्य आहे याचा विचार आज सर्वच थरातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात ‘निसर्ग शिक्षण’ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळानं आज काही प्रमाणात पर्यावरण-शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे, यासाठी मंडळाचे आपण आभार मानलेच पाहिजेत. परंतु या निसर्ग-शिक्षणाला आणखी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणं, ही आजची नव्हे आताची गरज बनली आहे. निसर्ग-शिक्षण हे शाळेच्या चार भिंतीतले आणि त्याच्या बाहेरचे देखील असायला हवे. निसर्ग शिक्षणामध्ये ‘उपक्रमशीलता’ आणि ‘कृतिशीलता’ असायला हवी.

शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारे हवे, निसर्गाशी नाते जोडणारे आणि ‘निसर्ग माझा सखा, निसर्ग माझा बंधू’ अशी वैश्विक भावना निर्माण करणारे शिक्षण हवे. या शिक्षणातून आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांवरती आधी प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

दैनंदिन जीवनामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी, कृतिशीलता कशी असावी, कोणत्या चांगल्या सवयी आपण अंगीकाराव्यात, अशा अतिशय सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात. 

विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व त्यांची निगा, पर्यावरणपूरकता, स्वच्छता या गोष्टी पुन्हा एकदा बाळबोध पद्धतीने सांगणे, ही आजची गरज बनली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्याला आता महामंत्राइतके महत्त्व द्यावे लागणार आहे. पर्यावरणपूरकतेचे महत्त्व समजावून सांगावे लागणार आहे. स्वच्छता त्यांच्या अंगी भिनवावी लागणार आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेणे गरजेचे आहे. आठवड्यातून एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, भटकंती करणे, निसर्गातल्या नवनवीन गोष्टी शिकणे, श्रमदान करणे या गोष्टी लहानपणातच रुजवणे महत्त्वाचे आहे. वनस्पती, झाडेझुडपे, पानेफुले यांची शास्त्रशुद्ध माहिती, जलसाठे, ओढे, नाले स्वच्छ ठेवणे याबाबत सजगता आणायला हवी. पाण्याचा जपून वापर करणे, सायकलीचा वापर करणे, नैसर्गिक साधनांचा वापर वाढविणे, पाण्याचे महत्त्व जाणणे, शक्य तेवढे पायी चालणे, वाहनांचा वापर कमी करून रस्त्यांवरील गर्दी व प्रदूषण, या व अशा अनेक गोष्टींद्वारे शालेय आणि महाविद्यालयीन पातळीपासून विविध मोहीम राबवणे महत्त्वाचे आहे. 

निसर्गावर मनस्वी प्रेम करणारी, त्याची काळजी वाहणारी, निसर्गाचं महत्त्व जाणणारी कोणतीही व्यक्ती ही संवेदनशील आणि सर्वगुणसंपन्न असते. समानता, सर्वसमावेशकता, संयम, सहनशीलता, नेहमी इतरांना आनंद देणाºया गोष्टी निसर्गामध्ये आहेत. ऋषितुल्य झाडे, मन मोहून टाकणारी फुले, निरागस प्राणी-पक्षी, विशाल आकाश, शांत आणि तटस्थ डोंगराच्या रांगा यांच्याकडे पाहून आपण या गोष्टी शिकायला हव्यात. यासाठी निसर्ग भ्रमंती आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल आणि याच संवेदनशील पिढीच्या माध्यमातून आपला देश पुढे जात राहील.
- अरविंद म्हेत्रे
(लेखक निसर्ग माझा सखा परिवाराचे समन्वयक आहेत.)

Web Title: Education and education from school-college!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.