पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:02 PM2018-06-18T12:02:30+5:302018-06-18T12:02:30+5:30

पाच कोटींची तरतूद: प्राथमिक प्रकल्प अहवाल महापालिकेने फेटाळला

Development of Sambhaji Lake of Solapur will be done by Tourism Corporation | पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास

पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला पर्यटन महामंडळातर्फे सुशोभीकरण करण्यात येणारमनपाने साडेतीन कोटींचा आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे सादर

सोलापूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावाचा विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेला प्रकल्प अहवाल महापालिकेने फेटाळला आहे.

धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी निधी मंजूर झाला असून, सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  

संभाजी तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे तलावात जलपर्णीची वाढ झाल्याने सौंदर्य धोक्यात आले आहे. या तलावाकडे दरवर्षी स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने येतात. अलीकडच्या काळात तलावात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जलचर व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. 

याबाबत तक्रारी वाढल्यावर प्रदूषण मंडळाने मनपाला नोटीस दिली. त्यावर महापालिकेने तलावात येणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले आहे. तलावाभोवती निसर्गरम्य झाडी व फुलझाडांची लागवड केल्यावर शहराचे वैभव वाढणार आहे. त्यामुळे  स्मार्ट सिटीमधील संभाजी तलावाचा पर्यटन म्हणून विकास केल्यास सोलापूर शहरातील नागरिकांना तसेच बाहेरून येणाºया पर्यटकांना तलावाकाठच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येणार आहे.

 यापूर्वी तलावाच्या सुशोभीकरणासाठी मनपाने साडेतीन कोटींचा आराखडा तयार करून केंद्र शासनाकडे सादर केला होता. केंद्र शासनाने निधी मंजूर केला पण वितरित केला नाही. त्यामुळे आराखड्यातील तरतुदीचा खर्च १२ कोटींपर्यंत गेला. सुशोभीकरण कामासाठी  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावल  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.  
पर्यटन विभागाकडून  संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०१७-१८ मधून ५ कोटींचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात ५० लाख निधी दिला असून पुढील निधी टप्प्याटप्याने मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून तलावाचा विकास करण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने पर्यटन महामंडळाने प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करून आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली. पण चुकीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्यामुळे आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. 

धर्मवीर संभाजी तलावाच्या विकासासाठी शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला असून, पर्यटन महामंडळातर्फे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्राथमिक नियोजनात महामंडळाने विजापूर रोडच्या दिशेने मोठी भिंत बांधून त्यावर ऐतिहासिक चित्रे साकारण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. भिंत बांधल्याने तलावाचे सौंदर्य धोक्यात येणार असल्याने यात बदल सुचविला आहे.
- डॉ. अविनाश ढाकणे, 
आयुक्त, महापालिका

Web Title: Development of Sambhaji Lake of Solapur will be done by Tourism Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.