ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - खंदा खरीप हंगामातील तुरीचे वाढलेले क्षेत्र, उत्पादनात सरासरी वाढ यामुळे आनंदात असलेल्या शेतक-यांना ढासळलेल्या दरामुळे चिंतेचे ग्रहण लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात विक्रमी तूर उत्पादनाचा अंदाज असून नाफेडने आधारभूत भावाऐवजी तूर खरेदीसाठी खुल्या बाजारात उतरण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
 
राज्यात यंदा तुरीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत तूर लागवड क्षेत्रात ४५१ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. गतवर्षी २०१५-१६ साली जिल्ह्यात १९ हजार २८२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. यंदा तब्बल १ लाख ८ हजार ३६४ हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. हे प्रमाण गतवर्षी ७७ टक्के होते़ तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत ४५ पटीने अधिक म्हणजे ४५१ टक्के आहे. 
 
आजपर्यंत ज्या तालुक्यात तूर पीक कधीच घेतले जात नव्हते. मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यातही तुरीचे क्षेत्र वाढले आहे. समाधानकारक पाऊस आदी तुर डाळींचे वाढते दर यामुळे शेतकरी तुर पीकाकडे अधिक वळल्याचे दिसून येते. शासनाच्या पणन खात्याने राज्यात किमान आधारभूत भावाने तुरीची खरेदी करणारी केंद्रे सुरू केली आहेत. सध्या प्रति किवंटल ५ हजार ५० रूपये दराने ही खरेदी केली जाते. 
 
गतवर्षी तुरीचे उत्पादन घटल्याने १३ हजारावर हा दर गेला होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने तुरडाळ आयात केली. आता पेरणीक्षेत्र आणि उत्पादनातही वाढ झाल्याने भावात घसरण झाली. त्यामुळे शेतक-यांना खुल्या बाजारात विक्री करण्याऐवजी आधारभूत खरेदी केंद्राच्या आधार घ्यावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात नाफेडने बाजार समित्या आणि खरेदी विक्री संघामार्फत ही खरेदी सुरू केली आहे. मात्र सरकारने नियोजन अपुरे पडण्याची शक्यता आहे. उत्पादनातील वाढ लक्षात घेता ही केंद्रे अपुरी पडण्याची शक्यता आहे. 
 
नाफेडने खुल्या बाजारात उतरावे
आधारभूत भावाने खरेदी करण्याऐवजी नाफेडने ते तुर खरेदीसाठी खुल्या बाजारात उतरण्याची मागणी पुढे येत आहे. त्यासाठी सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाचे उदाहरण देण्यात येते. आतापर्यंत सीसीआय आधारभूत किंमतीवर कापसाची खरेदी करीत असे, परंतु यावर्षीपासून सीसीआय त्यापेक्षा अधिक भावाने खरेदी करीत आहे. याच धर्तीवर नाफेडने तुरीची खुल्या बाजारात खरेदी केल्यास शेतक-यांना चांगला दर मिळू शकतो.
 
तूर उत्पादनाचा उच्चांक
यंदा जिल्ह्यात १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये हेक्टरी सरासरी ३ ते ४ क्विंटल तुरीचे उत्पादन होत असे. आता कृषीतंत्रज्ञानामुळे संकरित बियाणे, ठिंबक सिंचन, लागवड पद्धतीत बदल यामुळे सरासरी उत्पादन हेक्टरी १० क्विंटलपर्यत जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर इतिहासात तुरीचे उच्चांकी उत्पादन यावर्षी होण्याची शक्यता आहे. हंगामात १० लाख ८० हजार क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे़
 
यंदा तुरीच्या पेरणी क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणार आहे. नवीन संकरित वाणाचा वापर, ठिबक सिंचन यामुळे सरासरी उत्पादन वाढले आहे. राज्यात सोलापूर जिल्हा तुरीच्या उत्पादनात आघाडीवर राहील असे वाटते. -  बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिक्षक, सोलापूर