सोलापूर जिल्हा प्रशासनासमोर बोगस मतदान रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:13 PM2018-06-27T15:13:50+5:302018-06-27T15:14:40+5:30

सोलापूर/बार्शी बाजार समिती निवडणूक : मतदान केंद्राध्यक्षावर जबाबदारी

Challenge of blocking bogus voting before Solapur district administration | सोलापूर जिल्हा प्रशासनासमोर बोगस मतदान रोखण्याचे आव्हान

सोलापूर जिल्हा प्रशासनासमोर बोगस मतदान रोखण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देखर्चाला मर्यादा नाही, आचारसंहितेची बोंबमतदानासाठी आधार, मतदान ओळखपत्र महत्त्वाचे १८ वर्षे पूर्ण असलेल्यांनाच मतदानाचा अधिकार

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या शेतकरी मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, वय, रहिवास असे अनेक घोळ आहेत. यातून बोगस मतदान आणि मतदान केंद्रांवर वादही होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मात्र यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येत असल्याचा दावा केला आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सहकार, पणन खात्याने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असला तरी निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेबाबत फारशी खबरदारी घेतलेली नाही. निवडणूक आयोगाने विविध निवडणुकांसाठी तयार केलेल्या निर्देशांचा आधारही सहकार निवडणूक प्राधिकरणाने घेतला नसल्याचे दिसत आहे.

१० गुंठ्यांवर शेतजमीन धारण करणाºया आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींचा मतदार यादीत समावेश करण्याचे निर्देश सहकार प्राधिकरणाने दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाने तलाठ्यांमार्फत मतदार यादी तयार करुन घेतली. आजवर जमिनींच्या नोंदीमध्ये घोळ घालण्यास प्रसिध्द असलेल्या तलाठी भाऊसाहेबांनी बाजार समितीच्या मतदार याद्यांमध्येही अनेक घोळ घातले आहेत.

लहान मुलांच्या नावाचाही मतदार यादीमध्ये समावेश आहे. अनेक मतदारांचे वयही चुकलेले आहे. एकाच गणाच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीच्या नावाचा पाच ते सहा वेळा समावेश आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतजमीन असलेली व्यक्ती तेथील रहिवासी असल्याचेही प्रशासनाने ग्राह्य धरलेले आहे. त्यामुळे इतर भागात रहिवास करणाºया व्यक्तीचाही मतदार यादीत समावेश आहे. मतदार यादीवर फोटो आणि पत्तेही नाहीत. यातून बोगस मतदानाला बराच वाव मिळत असल्याचे दिसते. 

१८ वर्षे पूर्ण असलेल्यांनाच मतदानाचा अधिकार
- जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या मतदार यादीमध्ये १८ वर्षांखालील व्यक्तींचाही समावेश आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदानासाठी येणाºया व्यक्तींनी वय वर्षे १८ पूर्ण असल्याबाबत पुरावा सोबत घेऊन येणे अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीच्या वयाबद्दल तक्रार असल्यास मतदान केंद्राध्यक्षांकडे संपर्क साधा. अशा व्यक्तींना मतदान केंद्राध्यक्ष मतदानापासून रोखू शकतील, असेही पाटील यांनी सांगितले. 

मतदानासाठी आधार, मतदान ओळखपत्र महत्त्वाचे 
-मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान ओळखपत्रासह आधार कार्ड, बँक पासबूक, पासपोर्ट आदींसह निवडणूक आयोगाने निश्चित केलेले पुरावे देता येतील. या गोष्टी तपासण्याचा अधिकार मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आला आहे. 

खर्चाला मर्यादा नाही, आचारसंहितेची बोंब
- या निवडणुकीतील खर्चाबाबत उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. १ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान होणार आहे. प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास आधी प्रचार थांबविणे अपेक्षित आहे. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाईची तरतूद नसल्याचे प्रशासनातील मंडळींचे म्हणणे आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी भाजपाने वर्तमानपत्रातून प्रचारपत्रिका वाटल्या होत्या. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हा प्रकार बाजार समितीच्या निवडणुकीत झाला तरी रोखणार कोण हा प्रश्न आहे. 

Web Title: Challenge of blocking bogus voting before Solapur district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.