नागपूर: सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. उपस्थितांनी ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष करीत घोषणेचे स्वागत केले. धनगर आरक्षण संघर्ष समितीने आयोजिलेल्या मेळाव्यात भाषणासाठी मुख्यमंत्री उभे राहिले असता, तरुणांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘ये कहाँ आ गये हम’ ही हिंदी गाणी वाजवून त्यांना आरक्षणाच्या आश्वासनाची जाणीव करून दिली.

मुख्यमंत्र्यांनीही ‘मी वादा विसरलेलो नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यानुसार कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत याबाबतची शिफारस करू शकलो असतो. ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविता आला असता. मात्र तो मान्य झाला नसता. संवैधानिक बाबींची पूर्तता करून लवकरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

धनगर समाजाकडून जल्लोष; शिवा संघटनेने जाळली मुख्यमंत्र्यांची प्रतिमा
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घोषणा करताच त्याचे सोलापूर शहरात संमिश्र पडसाद उमटले. धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सिद्धेश्वरांच्या नावासाठी आग्रही असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळून आपला संताप व्यक्त केला.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे ,या मागणीसाठी सोलापुरात धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी महामोर्चा काढून निवेदन दिले होते. त्याचवेळी लिंगायत समाजानेही सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्याची मागणी केली. यासाठी शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे रिपाइं, शिवसेना, सकल मराठा समाज, राष्टÑवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षातील नेत्यांनी स्वागत केले. तर शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष वीरभद्रेश बसवंती यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी कोंतम चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळली. तसेच सोलापूर-तुळजापूर रोडवर रस्ता रोको करुन आपला संताप व्यक्त केला.
‘अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला देताना वीरशैव लिंगायत समाजाला विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर अथवा सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची आमची मागणी जुनी होती,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले.

‘या संदर्भात शासनाने दोन्ही समाजाची बैठक बोलावायला हवी होती. त्यातून तोडगा निघू शकला असता. पण मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय घेतला. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. साहजिकच जागोजागी मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जात आहेत. लवकरच समाजाची व्यापक बैठक बोलावून पुढील दिशा ठरवली जाईल,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.