१९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शाळेचे बांधकाम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:46 PM2019-06-19T20:46:57+5:302019-06-19T20:48:41+5:30

पुनर्वसित चिंचणीकरांचा संघर्ष : अंगणवाडी भरते ग्रामपंचायत कार्यालयात

After 19 years of follow-up, the construction of the school is incomplete | १९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शाळेचे बांधकाम अपूर्णच

१९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शाळेचे बांधकाम अपूर्णच

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्वसित गावांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचा नियम नसल्याचे एकमेव कारणआपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी लोकवर्गणी व लोकसहभागातून पुनर्वसित चिंचणी (पिराची कुरोली), ता. पंढरपूर या गावाने शाळेचे बांधकाम सुरूया गावाने शाळेचे बांधकाम सुरू ठेवत प्रशासनाला चपराक दिली

पटवर्धन कुरोली : सन १९९८ साली निधीअभावी बंद पडलेले शाळेचे बांधकाम तब्बल १९ वर्षे पाठपुरावा, मागणी करूनही सुरू झालेच नाही. यासाठी पुनर्वसित गावांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचा नियम नसल्याचे एकमेव कारण देण्यात आले. मात्र, तरीही ग्रामस्थांनी खचून न जाता ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ याप्रमाणे आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी लोकवर्गणी व लोकसहभागातून पुनर्वसित चिंचणी (पिराची कुरोली), ता. पंढरपूर या गावाने शाळेचे बांधकाम सुरू ठेवत प्रशासनाला चपराक दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणाच्या निर्मितीनंतर चिंचणी या गावाने महाबळेश्वरच्या कुशीतून पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीच्या माळरानावर विस्थापित झाले. त्यावेळी धरणग्रस्तांना घरे बांधून देत असताना शाळेच्या बांधकामाचे कामही सुरू होते. मात्र, धरणग्रस्तांच्या जाचक अटींमुळे ठेकेदाराला बिले काढण्यास अडचणी निर्माण होत असल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने १९९८ साली सुरू असलेले झेडपी शाळेचे काम त्याचवेळी अर्धवट अवस्थेत सोडले.  १९ वर्षे शाळेचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असूनही प्रशासनाने त्या ठेकेदाराला ना जाब विचारला, ना त्याच्यावर कारवाई केली. मात्र, विस्थापित झालेल्या चिंचणीकरांना शिक्षणासाठी मात्र संघर्षच करावा लागला.

विस्थापित झालेल्या चिंचणीमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. वर्गखोल्यांअभावी एका खोलीत दोन वर्ग भरविण्याची  नामुष्की शिक्षण विभागावर येत आहे. तब्बल १९ वर्षे या शाळेचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी सामान्य प्रशासन पुनर्वसन प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी, पाठपुरावा करूनही अर्धवट शाळा, शाळा दुरुस्ती यासाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूदच   नियमात नसल्याचे एकमेव कारण विस्थापित चिंचणीकरांना ऐकावयास मिळाले. प्रशासन कोणतीही जबाबदारी घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी नाउमेद न होता अनेकांना मदतीचे आवाहनही केले. मात्र, आवश्यक मदत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आमच्या               गावात आम्हीच सरकार म्हणत रडत न बसता लोकसहभाग व लोकवर्गणीतून अर्धवट शाळेच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. बघता बघता शाळेचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

अंगणवाडी भरते ग्रामपंचायत कार्यालयात
- जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामस्थांनी तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यानंतरही त्यांना हक्काच्या खोल्या मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी श्रमदानातून, लोकवर्गणीतून शाळेचे बांधकाम पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यानंतर अंगणवाडीसाठीही ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच असून अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाडी भरवत मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.

शाळा खोल्यांसाठी आम्ही मदतीचे आवाहन केल्यानंतर रोटरी क्लब पंढरपूर, पिराची कुरोली ग्रामपंचायत व काही जणांनी मदतीसाठी पुढे येत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आणखी सुविधांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. शासनानेही जाचक अटी शिथिल करत मदत केल्यास आमची मुले गावातील हक्काच्या शाळेत  शिकतील. 
- मोहन अनपट, जिल्हाध्यक्ष, श्रमिक मुक्तीदल

Web Title: After 19 years of follow-up, the construction of the school is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.