सोलापूर बाजार समितीत ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:34 PM2018-05-22T12:34:15+5:302018-05-22T12:34:15+5:30

चौकशीनंतर गुन्हे दाखल करणार : विशेष लेखा परीक्षकांचा पोलीस ठाण्यात अर्ज

39 crore worth of corruption in Solapur Bazar Samiti | सोलापूर बाजार समितीत ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार 

सोलापूर बाजार समितीत ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार 

Next
ठळक मुद्देराजकीय वर्तुळात खळबळ उडाली दिलीप माने आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्रयाचिकेवर जूनमध्ये सुनावणी

सोलापूर: सोलापूर बाजार समितीची निवडणूक जाहीर होण्यास काही अवधी शिल्लक असतानाच २०११ ते २०१६ या कालावधीतील कामाचे विशेष लेखा परीक्षण करण्यात आले. त्यात सोलापूर बाजार समितीत ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे, तर अहवालानुसार तत्कालीन सभापती दिलीप माने आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र चौकशी अधिकारी विशेष लेखा परीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी जेलरोड पोलिसांना दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


सोलापूर बाजार समिती संचालक मंडळाने एप्रिल २०११ ते मार्च २०१६ या कालावधीत केलेल्या कारभाराची चौकशी करण्याचे पत्र पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर यांनी जून २०१७ मध्ये केली होती. त्यांनी २२ मुद्यांचा चौकशीच्या पत्रात उल्लेख केला होता. पणन संचालक आनंद जोगदंड यांनी चौकशी अधिकारी म्हणून सुरेश काकडे यांची नियुक्ती केली होती. काकडे यांनी २० ते २२ लेखा परीक्षकांची नियुक्ती बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी केली होती.

काकडे यांनी अंतिम अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केला होता. वरिष्ठांनी परवानगी दिल्यानंतर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांना दाखवून त्यांचा अभिप्राय घेतला. त्यांच्या अभिप्रायानंतर जेलरोड पोलीस ठाण्याकडे तो अहवाल सादर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

काकडे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात १ एप्रिल २०११ ते १९ आॅक्टोबर २०११ या कालावधीत १४ समिती सदस्य, १ सचिव, १९ आॅक्टोबर २०११ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत २० समिती सदस्य, २ सचिवांनी अपहार केला आहे. बाजार समितीच्या मुदतठेवी ठेवताना फायदा होईल अशारितीने ठेवल्या नाहीत, बांधकाम मुदतीत न केलेल्या ठेकेदाराकडून दंड वसूल केला नाही, अशा विविध प्रकारचे १४ मुद्दे तक्रारी अर्जात दिलेले आहेत. तसेच सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत तत्कालीन सभापती, समितीचे सदस्य, बाजार समितीचे विश्वस्त या पाच वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे तक्रारी अर्जात नमूद केले आहे. 
विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर ते सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

याचिकेवर जूनमध्ये सुनावणी
सहा कोटी ४१ लाखांची जबाबदारी यापूर्वी उपनिबंधक अरुण सातपुते यांनी केलेल्या एक वर्षाच्या (२०१५-२०१६) कामकाजाच्या चौकशीत बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष चंद्रकांत खुपसंगे, संचालक गजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, केदार विभूते, सोजल पाटील, इंदुमती परमानंद अलगोंड, शांताबाई जगन्नाथ होनमुर्गीकर, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, नसीरअहमद खलिपा, बसवराज दुलंगे, उत्तरेश्वर भुट्टे, हकीम शेख, सिद्धाराम चाकोते, धनराज कमलापुरे यांच्यावर निश्चित केली होती.  ही रक्कम वरील संचालकांकडून वसूल करण्याचे सातपुते यांनी दिलेल्या अहवालत म्हटले होते. त्यानुसार वसुलीसाठीच्या नोटिसा संबंधितांना बजावल्या आहेत. यावर या संचालकांनी उच्च न्यायालायत वसुली आदेशाला स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. यावर जून २०१८ मध्ये सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी ६ लाख ३९ हजार १९३ रुपयांचा अपहार झाला आहे, अशी तक्रार विशेष लेखा परीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी सोमवारी जेलरोड पोलिसांकडे केली. त्या तक्रारी अर्जाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
-अपर्णा गीते, पोलीस उपायुक्त

Web Title: 39 crore worth of corruption in Solapur Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.