सोलापुरात वीस हजार कोटींचे टेक्स्टाईल व्हिजन, योगगुरू बाबा रामदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:35 PM2018-03-19T14:35:14+5:302018-03-19T14:35:14+5:30

सोलापूर टेक्स्टाईल व गारमेंट उद्योजकांशी साधला संवाद, उद्योग वाढविण्यावर भर देणार

20 thousand cr. rupees textile Vision, Yogguru Baba Ramdev in Solapur | सोलापुरात वीस हजार कोटींचे टेक्स्टाईल व्हिजन, योगगुरू बाबा रामदेव

सोलापुरात वीस हजार कोटींचे टेक्स्टाईल व्हिजन, योगगुरू बाबा रामदेव

Next
ठळक मुद्देएखादा उद्योग जर वाढायचा असेल तर त्याची विश्वासार्हता आणि गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे : रामदेवबाबाएक जिद्द ठेवून सुरुवातीला पतंजलीच्या माध्यमातून औषधी निर्माण केली : रामदेवबाबा

सोलापूर : कोणत्याही व्यवसायाचा खºया अर्थाने विकास व्हायचा असेल तर गुणवत्तेशी तडजोड करू नका. गेल्या २५ वर्षांपासून पतंजलीच्या माध्यमातून नफा-तोट्याचा विचार न करता व्यवसाय केला जात आहे. ५ वर्षांपासून टेक्स्टाईल उद्योगाचा संकल्प आहे़ १५ ते २० हजार कोटींचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात सोलापूरचा समावेश होईल, अशी माहिती योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी दिली. 

पतंजली योग समिती, सोलापूर व सारथी फाउंडेशनच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापुरातील टेक्स्टाईल व गारमेंट उद्योजकांशी सुसंवाद या चर्चासत्रात स्वामी रामदेवबाबा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, वस्त्रोद्योग व सहकारमंत्री सुभाष देशमुख, दक्षिण भारत महिला प्रभारी पतंजली योग समिती अध्यक्षा सुधाताई अळ्ळीमोरे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसकी, सारथी फाउंडेशनचे संस्थापक श्रीनिवास बुरा, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ अध्यक्ष रामवल्लभ जाजू आदी उपस्थित होते.

चर्चासत्रात बोलताना स्वामी रामदेवबाबा म्हणाले की, एखादा उद्योग जर वाढायचा असेल तर त्याची विश्वासार्हता आणि गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. मी एका गावातून आलो, गुरुकुलमध्ये शिकलो, एक जिद्द ठेवून सुरुवातीला पतंजलीच्या माध्यमातून औषधी निर्माण केली. गुणवत्तेला प्राधान्य देऊन आम्ही पतंजलीच्या विविध औषधी उत्पादनासाठी हजारो टन केशर, सोने, चांदी, हिरे, मोतीची खरेदी केली़ १0 वर्षांत औषधांची किंमत वाढविली नाही. आजवर प्रामाणिकपणे काम केले असून, मला रात्रीची शांत झोप येते, असे स्वामी रामदेवबाबा म्हणाले़ 

उद्योग कोणताही असो त्याचे काम विश्वसनीय असले पाहिजे. गुणवत्तेला कोणतीही तडजोड करू नये असे सांगत स्वामी रामदेवबाबा म्हणाले की, टॉवेल, चादर, गारमेंट, लहान मुलांचे कपडे आदी सर्व प्रकारच्या कापड उद्योगात पतंजली उतरणार आहे. सोलापुरातील टॉवेल, चादर, गारमेंट आदी उद्योग क्षेत्राशी निगडीत बाबींचा समावेश पतंजलीच्या व्यवसायात करणार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. यामध्ये सर्वांची मदत लागणार आहे, यातून सोलापूरचा विकास होईल, पर्यायाने महाराष्ट्राचा आणि देशाचा होईल. भारताला मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर नेता येईल, अशा विश्वासही यावेळी स्वामी रामदेवबाबा यांनी व्यक्त केला.

लोकमतच्या लेखाचा आवर्जून उल्लेख 
- वस्त्रोद्योग व सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, लोकमत मध्ये दखल या सदरात ‘चला सोलापूर विकुया’ या मथळ्याखाली सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे याचा लेख लिहिला होता. लेखातून सोलापूरच्या सत्य परिस्थितीची मांडणी करण्यात आली होती. जसे मेक इन महाराष्ट्रची घोषणा झाली होती, तशीच मेक इन सोलापूर कसे होईल याचा प्रयत्न मी करीत आहे. येत्या दोन वर्षांत सोलापूरचे नाव झाले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.  सोलापुरात टेक्स्टाईल उद्योग आहे, टेक्स्टाईल विभागाचा मंत्री म्हणून स्वामी रामदेवबाबा यांनी माझा फायदा करून द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

कोण काय म्हणाले...
- सोलापुरात एक्सपोर्ट मंडळ आहे, आम्ही जेव्हा साऊथ आफ्रिकेचा सर्व्हे केला तेव्हा सोलापूरच्या टेक्स्टाईल, गारमेंटला तिथे प्रचंड मागणी असल्याचे दिसून आले. सोलापूरच्या उत्पादनाला पतंजलीचे स्टिकर लागल्यास येथील माल परदेशात मोठ्या प्रमाणात जाईल. पतंजलीचे नाव खराब न करता गुणवत्तेत वाढ करून दर्जेदार उत्पादन देऊ असे आश्वासन यावेळी सोलापूर रेडिमेड कापड उत्पाक संघाचे सहसचिव  अमित जैन यांनी दिले. 

- सोलापूरच्या महिलांसाठी काही तरी उद्योग निर्माण करण्याची खूप इच्छा होती. ही इच्छा पूर्ण होत असून, स्वामी रामदेवबाबा यांनी इथला माल घेतल्यास तो उद्योग टिकून राहील, असे मत  दक्षिण भारत महिला प्रभारी पतंजली योग समिती अध्यक्षा सुधाताई अळ्ळीमोरे यांनी व्यक्त केले. 

- पतंजलीच्या विविध उद्योगांची हजारो कोटींमध्ये उलाढाल आहे, यामध्ये सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचा समावेश करण्यात यावा. सोलापूरच्या उद्योगाला चालना मिळेल, असे मत  चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केले. 

- सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी स्थानिक यंत्रमागाची माहिती देत पतंजलीच्या माध्यमातून कसा फायदा होईल याची माहिती दिली. 

बाबा का पता नही हिलेगा
- आजवर हाती घेतलेले काम मी कधीच सोडून दिले नाही. व्यवसायात तोटा झाला तरी त्याची पर्वा केली नाही. एकीकडचा तोटा दुसरीकडच्या नफ्याने भरून काढत होतो. गुणवत्तेला तडजोड केली नाही, प्रामाणिकपणे काम केले आहे असे सांगत ‘सत्ता किसी की भी हो, बाबा का पत्ता कभी हिलेगा नहीं’ असा आत्मविश्वास व्यक्त केला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

Web Title: 20 thousand cr. rupees textile Vision, Yogguru Baba Ramdev in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.