सोलापुरातील जिल्ह्यात २ लाख ७३ हजार मजुरांना रोजगाराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 03:14 PM2018-10-27T15:14:48+5:302018-10-27T15:18:47+5:30

दुष्काळाची दाहकता: झेडपीने दिले ५४५१ मजुरांना जॉबकार्ड

2. Employment concerns of 2 lakh 73 thousand laborers in Solapur district | सोलापुरातील जिल्ह्यात २ लाख ७३ हजार मजुरांना रोजगाराची चिंता

सोलापुरातील जिल्ह्यात २ लाख ७३ हजार मजुरांना रोजगाराची चिंता

Next
ठळक मुद्देजिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्थासोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात भूमीहीन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. याबाबत झेडपीने शासनाला अहवाल सादर केला असून, टंचाई स्थिती घोषित झाल्यावर या लोकांना तातडीने काम दिले जाणार आहे.  

जिल्हा प्रशासनाने पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्व त्या उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ४३४ मजुरांना काम लागणार आहे. यातील ३३ हजार ८०३ मजुरांनी कामाची मागणी केलेली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ८९९ भूमीहीन मजूर असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोजगारांची अत्यंत गरज असलेल्या ५ हजार १२८ मजुरांना ग्रामपंचायतीमार्फत जॉबकार्डचे वाटप करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे काम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
अद्याप १ लाख ६१ हजार ३२८ मजूर कामाच्या व जॉबकार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्याला टंचाई स्थिती लागू झाल्यावर मागेल त्या मजुराला काम देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जॉबकार्डही देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना राबविण्यात राज्यात सोलापूर अग्रेसर असल्याची माहिती झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा केवळ ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिके तर हातची गेली. याशिवाय रब्बी हंगामात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली. खरीप हंगामाचा हा काढणीचा काळ असतो. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना या काळात हाताला काम मिळते. 

बाजरी, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग काढणीच्या हंगामात अनेकांना काम मिळते. पण शेती ओसाड असल्याने शेतमजुरांना काम नाही. याशिवाय रब्बीच्या काळात ज्वारी, गहू, हरभरा, पेरणी, खुरपणी, कोळपणीचे काम लागते. पण दुष्काळामुळे पेरणीच न झाल्याने मजुरांना हेही काम मिळालेले नाही. त्यामुळे महिला व मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.  

तालुकानिहाय मजुरांची संख्या 
- तालुकानिहाय मजुरांची संख्या व त्यातील कार्यान्वित झालेले मजूर पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट: २३३०३, कार्यान्वित: २६७७, बार्शी: ३४२६५ (७१४१), करमाळा: ३४७११ (४३४२), माढा: २८७६७ (४३८५), माळशिरस: २४८९९ (४०२२), मंगळवेढा: १९९३१( ३०२३), मोहोळ: २३१०८ (२२४६), पंढरपूर: २९९४७ (१७८९), सांगोला: २७०६९ (१२७५), दक्षिण सोलापूर: १९०२५ (२२३०), उत्तर सोलापूर: ८४०८ (६७३).

Web Title: 2. Employment concerns of 2 lakh 73 thousand laborers in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.