फ्लॅशबॅक 2016: सप्टेंबर

By admin | Published: December 24, 2016 12:00 AM2016-12-24T00:00:00+5:302016-12-24T00:00:00+5:30

भारतीय लष्कराच्या जवानांनी २८ सप्टेंबर रोजी नियंत्रण रेषा ओलांडत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता केला. सुमारे ५ तासांच्या या लक्ष्यभेदी कारवाईत सुमारे ४० दहशतवादी ठार झाले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान पुरते हादरले.

जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या तळावर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर रोजी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात लष्कराचे तब्बल १७ जवान शहीद झाले तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले. तर लष्कराने केलेल्या कारवाईत चारही हल्लेखोर ठार झाले.

कित्येक कोटी रुपयांचा प्राप्तिकर भरूनही वर्सोवातील कार्यालयासाठी मुंबई महापालिका अधिका-याने पाच लाखांची मगितल्याचा आरोप विनोदवीर कपिल शर्माने ट्विटरवरून केला. त्यामध्ये त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत हेच का ते अच्छे दिन असा सवाल विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट करत कपिलला ठोस कारवाईची हमी दिली.

दिल्लीहून मुंबईला नोकरीनिमित्त आलेल्या प्रीती राठी या तरूणीवर अॅसिड हल्ला करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला तिचा शेजारी अंकुर पनवारला विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

खून खंडणीसाठी अपहरण बलात्कार आणि लहान मुलांची तस्करी अशा गुन्ह्यातील कैद्यांना सहजरित्या पॅरोल मिळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने नियमांत दुरूस्ती केली.

गोवा विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर यांना हटवल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि इतिहासात पहिल्यांदाच संघामध्ये बंडाची घटना घडली. तब्बल ३०० स्वयंसेवकांनी आपापले काम थांबवण्याचा इशारा दिला. वेलिंगकर यांना संघचालक म्हणून नियुक्त न केल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी काम करू असे कडवे आव्हानही त्यांनी दिले होते.