दोन अपघातात दोघांचा मृत्यू, पाटमधील शिवसेना शाखाप्रमुखाची डंपरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 09:46 PM2018-01-22T21:46:17+5:302018-01-22T21:46:27+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले.

Two killed in two accidents, Shiv Sena branch in Patna hit the Dump | दोन अपघातात दोघांचा मृत्यू, पाटमधील शिवसेना शाखाप्रमुखाची डंपरला धडक

दोन अपघातात दोघांचा मृत्यू, पाटमधील शिवसेना शाखाप्रमुखाची डंपरला धडक

googlenewsNext

कुडाळ, बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-पाट रस्त्यावर डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात पाट गावचे शिवसेना शाखाप्रमुख यशवंत आनंद परब (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या अपघातात मुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे मुंबईहून-गोव्याच्या दिशेने पर्यटकांना घेऊन जाणा-या खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्ता कामावरील मुकादम नागराज दुर्गाप्पा गडेकर (३१, मुळ रा. बैलहोंगल, बेळगाव, सध्या रा. चांदेल-गोवा) हा ठार झाला.

कुडाळ-पाट रस्त्यावरील अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पिंगुळी एमआयडीसीनजीक घडला. यशवंत परब (रा. पाट-परबवाडा) यांचे पिंगुळी येथे सोलर सिस्टीम विक्रीचे दुकान आहे. तसेच ते कुडाळ येथील एका सोनाराकडेही कामाला होते. त्यामुळे त्यांची दररोज पिंगुळी व कुडाळला ये-जा असायची. रोजच्याप्रमाणे सोमवारी सकाळी ते पाट येथून दुचाकीने कुडाळला येत होते. पिंगुळी-पाट रस्त्यावर पिंगुळी एमआयडीसीच्या दरम्यान समोरून येणारा डंपर व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात परब दुचाकीसह जमिनीवर आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धावत घेत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी  ठरले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व इतर तपासणी केली.  

बांदा येथे झालेल्या अपघातात चांदेल-गोवा येथे राहत असलेले नागराज गडेकर हे सोमवार आठवडा बाजार असल्याने बांदा येथे आले होते. ते मुकादम असल्याने क्वारी, क्रशर तसेच अन्य मजुरीच्या कामासाठी कामगार पुरवित असत. विलवडे येथे क्वारीवर असलेल्या कामगारांना पगार देण्यासाठी गेले होते. तेथून  ते बांदा शहरात बाजारासाठी येत होते.

महामार्गावर  कट्टा कॉर्नर येथून बांदा शहरात येण्यासाठी महामार्ग ओलांडताना त्यांना मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया खासगी आराम बसने (जीजे 0३ बीव्ही ४१0३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  जोरदार धडक दिली. या धडकेने नागराज हे बसच्या पाठीमागील चाकाला जाउन धडकले. यामध्ये त्यांच्या पाठीला व पोटाच्या बरगडयांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने नागराज याला तत्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. प्रणाली कासार यांनी उपचार केले. मात्र नागराज यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला. मात्र रुग्णवाहिका येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत प्रकरणी बसचालक संदिप पंडित सेजुल (वय २६, रा. बुलढाणा) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबाचा आधार गेला
यशवंत परब हे कुटुंबाचा प्रमुख आधार होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारवड हरपला असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.र्

रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात  १0८ रुग्णवाहिका आहे. मात्र रुग्णवाहिकेवर वैद्यकिय अधिकारी नसल्याने ती बंद आहे. गंभीर जखमी असलेले नागराज गडेकर यांना उपचारासाठी तातडीने बांबोळी येथे हलविणे गरजेचे होते. मात्र रुग्णवाहिका शोधण्यातच अर्धा तास गेल्याने नागराज यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा आरोग्य केंद्र हे महत्वाचे आरोग्य केंद्र असून याठिकाणी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: Two killed in two accidents, Shiv Sena branch in Patna hit the Dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.