अनंत जाधव / सावंतवाडी
पश्चिम घाटात येत असलेल्या आंबोलीपासून तिलारीपर्यंतच्या जंगलात सध्या वेगवेगळ्या प्राण्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. या पट्ट्यात पट्टेरी वाघाच्या पाऊल खुणांबरोबरच वेगवेगळे प्राणी दृष्टीस पडत आहेत. तिलारीच्या जंगलातील मुबलक पाणीसाठा तसेच तीन राज्यांचे मिळून असलेले घनदाट जंगल यामुळे बहुतांश प्राण्यांचे तिलारीचे जंगल माहेरघरच ठरत आहे. मध्यंतरी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हे सिद्ध झाले आहे.
माणगाव खोऱ्यात पकडण्यात आलेल्या तीन हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना तिलारीच्या जंगलात ठेवण्याचा वनविभागाचा प्रस्ताव होता. मात्र, दोडामार्ग तालुक्यात या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. याच तिलारीत अनेक प्राण्यांच्या पाऊलखुणा सध्या आढळून आल्या आहेत.
वनविभागाने आॅगस्ट २०१४ मध्ये सिंधुदुर्गमधील काही जंगलात कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यामध्ये प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळल्या. यातील जास्तीत जास्त प्राणी हे आंबोली व तिलारीतील केंद्रेच्या जंगलात आढळून आले आहेत.
आंबोली व तिलारी पश्चिम घाटात येत असून सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो. या परिसरातच मोठ्या प्रमाणात मायनिंग तसेच पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, हा परिसर इको-सेन्सिटिव्हमध्ये येत असल्याने हे प्रकल्प कागदावरच असून प्रत्यक्षात कृतीत उतरले नाहीत. जर हे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले तर अनेक औषधी वनस्पती तसेच वन्य प्राणी नाहिसे होणार आहेत.
तिलारी, आंबोली जंगलात राहणारे वन्यप्राणी खाद्य मिळविण्यासाठी मानवी वस्तीत येत असतात. त्यामुळे या प्राण्यांसाठी जंगलातच त्यांच्या खाद्याची सोय केल्यास ते वस्तीत येणार नाहीत.