सावंतवाडी - सोनुर्ली-गावठणवाडी येथील आठवीत शिकणारा साहिल नामदेव आरोंदेकर (१३) हा शाळकरी विद्यार्थी सावंतवाडी तालुक्यातील तापाचा चौथा बळी ठरला आहे. त्याचे सोमवारी रात्री उशिरा बांबोळी-गोवा येथे न्यूमोनियासदृश तापाने निधन झाले. दरम्यान, सावंतवाडी रुग्णालयात मंगळवारी नव्याने डेंग्यूचा एक तर तापाचे दोन रुग्ण दाखल झाले आहेत.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र याची आरोग्य प्रशासन कोणतीही दखल घेताना दिसत नाही. गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात तिघांचे बळी गेले होते. यात आंबेगाव येथील संदीप पाटील या विद्यार्थ्याचा तापानेच आकस्मिक मृत्यू झाला होता. मात्र तापाचे निदान अद्याप झाले नाही. तर शहरातील रिक्षा व्यावसायिक पावलू जुआव डिमेलो व मळगाव येथील सतेज गोसावी यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर साहिल याचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याने तो चौथा बळी ठरला आहे.
साहिल याला आठ दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यातच रविवारी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याने अधिक उपचाराकरिता बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले होते. तेथे गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र साहिल हा उपचारांना साथ देत नव्हता. त्यातच त्याचे निधन झाले. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात न्यूमोनिया तापाची लक्षणे आढळून आली होती. 
साहिलच्या निधनाचे वृत्त समजताच सोनुर्ली गावावर शोककळा पसरली. साहिल हा हुशार व मनमिळाऊ होता. तो सोनुर्ली हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच त्याला श्रद्धांजली अर्पण करून हायस्कूलला सुटी देण्यात आली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. 
 
डेंग्यूसदृश तापाने निरवडेतील युवती गंभीर 
सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विचित्र तापाची साथ पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा निरवडे येथील युवतीला डेंग्यूसदृश ताप येत असल्याचे निष्पन्न झाले. तिला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने तिला बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे. तर दोन बालकांना ताप आल्यामुळे त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
साहिलच्या भावालाही ताप
साहिलच्या मोठ्या भावालाही काही दिवसांपासून ताप येत आहे. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बांबोळी-गोवा येथे उपचार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.