सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकरानी जनता रूपी ईश्वरी संकेताचा विचार करावा : सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:56 PM2017-11-01T17:56:15+5:302017-11-01T18:08:06+5:30

2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून दीपक केसरकर पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत हा ईश्वरी संकेतच जनतेने एकप्रकारे त्यांना दिला आहे. हे पालकमंत्र्यांनी लक्षात घ्यावे अशी टिका सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केली.

Sindhudurg's Guardian Minister, Kesarkarani should consider the divine form of the public: Satish Sawant | सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकरानी जनता रूपी ईश्वरी संकेताचा विचार करावा : सतीश सावंत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकरानी जनता रूपी ईश्वरी संकेताचा विचार करावा : सतीश सावंत

Next
ठळक मुद्देपत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा टोलाजिल्ह्यातील चीपी विमानतळ, सी-वर्ल्ड अशा अनेक प्रकल्पांची वाताहात पालकमंत्र्यांकडुन गेल्या 3 वर्षात फक्त घोषणाबाजी राणेंचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा द्वेष करणे हा पालकमंत्र्यांचा एककलमी कार्यक्रम

कणकवली ,दि. ०१ :  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे निष्क्रिय आहेत. नारायण राणेंबाबत ईश्वरी संकेताच्या गोष्टी ते करीत आहेत. मात्र, येथील जनता म्हणजेच ईश्वर असून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत केसरकराना तीने नाकारले आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून दीपक केसरकर पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत हा ईश्वरी संकेतच जनतेने एकप्रकारे त्यांना दिला आहे. हे त्यानी लक्षात घ्यावे अशी टिका सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केली.


येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, सरचिटणीस शरद कर्ले उपस्थित होते.


यावेळी सतीश सावंत म्हणाले, पालकमंत्र्यांकडुन गेल्या 3 वर्षात फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यानी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? याची माहिती त्यानी जनतेला द्यावी. चीपी विमानतळ, सी - वर्ल्ड अशा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची वाताहात झाली आहे. 'चांदा ते बांदा' योजनेच्या 58 बैठका झाल्या आहेत. मात्र, घोषणे पलीकडे अजुन काहीच झालेले नाही. त्यामुळे केसरकरानी जनतेची दिशाभूल करणारी पोपट पंची थांबवावी.

पालकमंत्री दीपक केसरकर मांत्रिक बाबाच्या सहवासात असतात. सावंतवाडीत निवडणुकीच्या काळात लिंबू,टाचण्याच्या वापराबरोबरच कोवाळे कापले जातात. जादू टोण्यावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या केसरकरांनी मांत्रिक ,तांत्रिकाचा वापर करून विकास होणार नाही. हे लक्षात घ्यावे. त्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

विकासाची धमक फक्त नारायण राणेंमध्येच आहे. त्यांचा दरारा आणि स्वतःचा दरारा काय आहे हे अगोदर तपासून पहावे आणि त्यानंतरच टिका करावी. राणेंच्या मंत्रिपदाची चिंता त्यानी करू नये. राणेंचा दरारा काय असतो हे त्यानी मुख्यमंत्र्यांना विचारावे.


राणेंचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा द्वेष करणे आणि टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यावरतीच केसरकर आपले पक्षातील स्थान बळकट करण्याचे काम करीत आहेत.
दीपक केसरकरांच्या मंत्रीपदाचा कोणताही उपयोग शिवसेनेला होत नाही.

निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा त्यानी केली होती. त्याचे काय झाले. नुसत्या वल्गणा करणाऱ्या केसरकराना हे जमत नसेल तर
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी जनतेसाठी रस्त्याच्या दूर्दशेमुळे होणाऱ्या त्रासापासुन सुटका होण्यासाठी वेदनाशामक औषधांची दुकाने उघडावित. अशी कोपरखळीहि सावंत यांनी यावेळी मारली.


सतीश सावंत म्हणाले, कर्जमाफी झालेल्या 585 शेतकऱ्यांचे 1 कोटि 65 लाख रूपये जिल्हा बँकेत जमा झाले आहेत. मात्र, दीपक केसरकर यानी प्रमाणपत्र वाटलेल्या तसेच सत्कार केलेल्या वीसही शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचे पैसे मिळालेले नाहीत. यावरून केसरकरांचा हातगुण लक्षात येतो.


पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळेच जिल्हा नियोजन मधील 130 कोटि मधील ३० कोटीचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परीषदेला विकास कामांसाठी निधी कमी पडणार आहे.


खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे नारायण राणेंचा जनाधार कमी झाल्याचे सांगत आहेत. मात्र, शिवसेनेकडे सत्ता असुनही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची पिछेहाट झाली आहे.

सावंतवाडीत विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा आमदार असताना 15 ग्रामपंचायती , कुडाळ मतदार संघात 25 ते 26 ग्रामपंचायती शिवसेनेच्या आल्या आहेत. परंतु आमदार नीतेश राणेंनी विरोधी पक्षात असुनही कणकवली मतदार संघातील 120 पैकी 85 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ताकद नेमकी कोणाची आहे.याचा त्यानी विचार करावा.


गेल्या तीन वर्षात केसरकर यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या घोषणा केल्या आहेत. त्या घोषणांचे त्यांनी काय केले ? याचा अहवाल , जमाखर्च त्यांनी जनतेला द्यावा. केलेल्या घोषणांपैकी एकही गोष्ट पालकामंत्र्यांकडून झालेली नाही त्यामुळे शिवसेना सत्तेत असूनही जिल्ह्यात त्यांना मिळालेल्या जनाधाराचे त्यानी आत्मचिंतन करावे.असेही सावंत यावेळी म्हणाले.


आमचे विकास करण्याचे उदिष्ट !


महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कोणाला बदनाम करणे अथवा टिका करण्याचे उद्दिष्ट नाही. येथील जनते बरोबरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे उदिष्ट आहे. त्यानुसार आम्ही काम करीत आहोत.असे सतीश सावंत यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: Sindhudurg's Guardian Minister, Kesarkarani should consider the divine form of the public: Satish Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.