सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 02:44 PM2018-08-24T14:44:11+5:302018-08-24T14:47:26+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर बुधवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Sindhudurg: The villagers stop the Mumbai-Goa highway, the mud-clan empire | सिंधुदुर्ग : ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य

कणकवली शहरालगत जानवली नदीपुलावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जानवली पुलावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याची डागडुजी तत्काळ करण्याची मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या पार्श्वभूमीवर जानवली नदीपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यात चिखल तयार झाला असून संपूर्ण रस्ताच जणू चिखलमय झाला आहे. या चिखलामुळे विद्यार्थ्यांसह वाहनचालक तसेच पादचारी त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, स्वरूपा विखाळे, दामोदर सावंत, राजू राठोड, रामदास विखाळे, मिलिंद केळुसकर, रिमेश चव्हाण, अ‍ॅड. हर्षद गावडे, स्वप्नील चिंदरकर यांच्यासह जानवली, कलमठ, तरंदळे येथील ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. तसेच वाहतूक कोंडीही झाली होती.

यादरम्यान जानवली नदीपुलाचे काम करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? दिलीप बिल्डकॉन की केसीसी बिल्डकॉनची? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जानवली पुलाची जबाबदारी आमची नसल्याचे दिलीप बिल्डकॉनचे गौतमकुमार यांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पुलाच्या दुरुस्तीवरून महामार्ग ठेकेदारांची काहीकाळ टोलवाटोलवी सुरु होती.


कणकवली शहरालगत जानवली नदीपुलावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

दोन तास होऊनही ठेकेदार अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, आक्रमक ग्रामस्थांनी अधिकारी आणि ठेकेदार येईपर्यंत हा रास्तारोको सुरू राहणार असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षकांनी आंदोलन मागे घ्या. अधिकारी अर्ध्या तासात येतील असे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी २० आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.

...अन्यथा कायदेशीर कारवाई करू

रास्तारोको आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खड्डे तत्काळ बुजविण्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, रास्ता रोकोनंतर तीन तास विलंबाने येणाऱ्या उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी धारेवर धरले. यापुढे आंदोलकांना त्वरित सामोरे जा, अन्यथा, फौजदारी कारवाई करू, असा इशारा शिवाजी कोळी यांनी यावेळी दिला.
 

Web Title: Sindhudurg: The villagers stop the Mumbai-Goa highway, the mud-clan empire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.