सिंधुदुर्ग :  आंजिवडे वनजमिनीत वृक्षतोड, दोघे ताब्यात, तिघे फरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:15 PM2018-09-25T12:15:50+5:302018-09-25T12:18:47+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असतानाच कुडाळ येथील वनपथकाने आंजिवडे येथील वनक्षेत्रात सुरू असलेल्या वृक्षतोडीवर कारवाई केली आहे.

Sindhudurg: tree in Angeiwade Vanamini, both in possession, and three fugitives | सिंधुदुर्ग :  आंजिवडे वनजमिनीत वृक्षतोड, दोघे ताब्यात, तिघे फरारी

आंजिवडे येथील वनजमिनीतील जप्त मालासमवेत वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर, हरी लाड, सचिन कांबळे, बाळराजे जगताप, पुळास संतोष यादव, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देआंजिवडे वनजमिनीत वृक्षतोड, दोघे ताब्यात, तिघे फरारी कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांवर पेट्रोल कटर फेकले

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असतानाच कुडाळ येथील वनपथकाने आंजिवडे येथील वनक्षेत्रात सुरू असलेल्या वृक्षतोडीवर कारवाई केली आहे.

या प्रकरणी वनविभागाने पेट्रोल कटरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तर तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या वनकर्मचाऱ्यावरच पेट्रोल कटर फेकण्यात आल्याने कर्मचारी चांगलेच घाबरले होते. 

कुडाळ वनविभागाचे वनरक्षक नेहमीप्रमाणे आंजिवडेसह इतर भागात गस्त करीत असताना त्यांना पेट्रोल कटर मशीनचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गेले असता चार ते पाच व्यक्ती मशिनच्या साहाय्याने वृक्षतोड करीत असल्याचे दिसून आले.

या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता गेले असता यातील उत्तम पंदारे याने वनरक्षक यांच्या अंगावर चालू अवस्थेत असलेली पेट्रोल कटर मशीन टाकून अंधाराचा फायदा घेत साथीदारांसह पलायन केले.

या वृक्षतोड प्रकरणी जागेवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला मुद्देमाल कटर मशीन, कोयता, पेट्रोल कॅन, मशीनसाठी वापरलेले आॅईल, १८ इंची मशीन वापरासाठीची चैन, प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक खोल, आरोपींची चप्पल आदी मुद्देमाल वनरक्षकांनी ताब्यात घेतला. तसेच पंदारे यांचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही.

कुडाळ वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर, वसोली वनपाल हरी लाड, वनरक्षक सचिन कांबळे, शिवापूर वनरक्षक बाळराजे जगताप, पुळास वनरक्षक संतोष यादव, वाडोस वनरक्षक प्रियांका पाटील, वसोली वनमजूर निकम आदी कर्मचाऱ्यांसह व दोन पंचांसमवेत फरार आरोपी उत्तम यशवंत पंदारे याला आंजिवडे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली.

यावेळी घटनास्थळावरून २९,५०० रूपये किंमतीचे पाच साग, २७,५८९ रूपये किंमतीचे १३ साग नग, अवैध वृक्षतोड प्रकरणी वापरलेली हत्यारे व इतर साहित्य पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.

ताब्यात घेतलेला उत्तम यशवंत पंदारे याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रेंज कार्यालय कुडाळ येथे आणण्यात आले. त्याच्या जबाबानुसार गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सखाराम कृष्णा शेडगे याला ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता ८ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात येऊन त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

गुन्ह्यामध्ये अद्याप तीन आरोपी फरार असून गुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे तसेच कुडाळ वनकर्मचारी यांच्या सहकार्याने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

केरळीयनांकडून जंगल सपाटीकरण

तत्कालीन निवृत्त वनअधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यातील शिवापूर आंजिवडे तसेच अन्य वनजमिनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केरळीयनांनी तर तेथे असलेल्या जंगलाचे सपाटीकरण केले. शिवाय महत्त्वाच्या प्राण्यांचीही शिकार केली आहे. पण याची वाच्यता कुठेही होऊ दिली नाही.

Web Title: Sindhudurg: tree in Angeiwade Vanamini, both in possession, and three fugitives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.