सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच : सुभाष देसाई, शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 06:27 PM2018-02-05T18:27:41+5:302018-02-05T18:34:35+5:30

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही जनतेच्या मतासोबत जाणार असून या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे, असे मत शिवसेना नेते व राज्याचे उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

Sindhudurg: Shiv Sena opposes Green Refinery project: Subhash Desai, vote expressed in Shiv Sena rally | सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच : सुभाष देसाई, शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केले मत

सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच : सुभाष देसाई, शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केले मत

Next
ठळक मुद्देसर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढणार : सुभाष देसाई कुडाळ येथील शिवसेनेच्या मेळाव्यात निर्धार

कुडाळ : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही जनतेच्या मतासोबत जाणार असून या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे, असे मत शिवसेना नेते व राज्याचे उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढणार असून महाराष्ट्र राज्यावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा सर्वांनी निर्धार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

कुडाळ महालक्ष्मी सभागृहामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र्र परब, संदेश पडते, जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, सभापती राजन जाधव, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संतोष शिरसाट, उपसभापती श्रेया परब, शिल्पा घुर्ये, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना कधीही मंद होणारी नाही तर ती तेजोमय होणारी असून, यापुढे नवनवीन शिखरे जिंकत जाईल. शिवसेनेत गुणांची व निष्ठेची कदर आहे. आता जनतेला शिवसेनाच हवी आहे. शिवसेना या चार अक्षरांच्या शेंदुरामुळे आमच्यासारखे सामान्य माणूस मोठे झालेत. राज्यात यापुढे शिवसेना कोणाही बरोबर युती करणार नाही.

राज्यावर यापुढे फक्त शिवसेनेचाच भगवा फडकणार असून त्या दृष्टीने पक्षाने टॉप गियर टाकलेला आहे. पण जिल्ह्यातील काहींचा रिव्हर्स गियर पडला आहे, असा टोला विरोधकांना व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लगावला. प्रत्येक कार्यकर्त्याने यापुढे फक्त शिवसेनाच लक्षात ठेवून काम करा, असे आवाहन उद्योगमंत्री देसाई त्यांनी केले.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आम्ही केलेल्या कामाचे श्रेय काहीजण घेत आहेत. हे राजकारणात होतच असते. काम करणे वेगळी बाब आहे आणि लोकांपर्यंत पोहोचविणे हे वेगळे आहे. शिवसैनिकांनी सत्तेच्या विरोधात राहून पक्ष वाढविला आहे. त्यामुळे संघटना वाढविण्याची माहिती आपणाला नक्कीच आहे.

शासकीय अधिकारी मनमानी करत आहेत. त्यांच्यापैकी एका अधिकाऱ्याला टोकाच्या जिल्ह्यात जावे लागले. आता एकच अधिकारी शिल्लक राहिला आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना मान न देणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य शासन केले जाईल. पूर्ण सत्ता नाही, त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागते. मात्र आपण काम करतो ते नागरिकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. लोकांना रोजगार दिला पाहिजे. त्यांची कामे केली पाहिजेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत आपण पोहोचवूया. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेणार आहे. असंख्य योजना आहेत.

मच्छिमार, नारळ बागायतदार, शेतकरी यांच्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. अन्य पक्षातील मंडळी या योजनेतील निधी मागत आहेत. ग्रामीण भागात पोहोचलेली यंत्रणा ही शिवसेनेची ताकद आहे. आठवड्यातील एक दिवस मी प्रत्येक तालुक्यासाठी देण्यास तयार आहे, असे आश्वासन दिले. नवे-जुने असा भेदभाव मनातून काढून टाका. जे नाराज आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या. आपणास पक्ष मोठा करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेची वाटचाल कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे. शिवसेनेत सर्वसामान्यांना पदे दिली. आपला पक्ष वेगळा पक्ष आहे. भाजपमध्ये लाटेवर काहीजण आमदार झाले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घराण्यांचे आमदार झाले. पण शिवसेनेत सर्वसामान्य आमदार झाले. शिवसेना औषधाला ठेवणार नाही, अशी वक्तव्ये करणारे मागे पडले आणि शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना येथे वाढली. शिवसेना संपवू, अशी शपथ घेणाऱ्यांना घरी बसविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन आराखडा ८० कोटींवरून १६० कोटींवर नेला. अनेक विकासकामे शिवसेनेने केली आहेत.

विकासकामे करून भागणार नाही, तर त्यासाठी पक्ष संघटनेलाही वेळ दिला पाहिजे. संघटनेच्या कामांसाठी वेळ द्या, आम्हांला तीच अपेक्षा आहे. निधी आणला तरी शिवसैनिकांच्या अडचणीही महत्त्वाच्या आहेत. राणे छोट्यामोठ्या विषयांवर राजकारण करीत आहेत. आज स्वाभिमानचे अस्तित्वच राहिलेले नाही.

चलबिचलता सगळ्याच पक्षात वाढत आहे. ती आपल्या कार्यकर्त्यांनी हेरली पाहिजे. पण पक्षात घेताना शिवसेनेच्या विचारांचेच कार्यकर्ते घेतले जातील, असे आमदार नाईक यांनी जाहीर केले. तसेच सत्तेत असूनही नाराजी आहे. ही शिवसैनिकांच्या मनातील खदखद आहे, त्याची दखल घ्यावी, असे आमदार नाईक यावेळी म्हणाले.

संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, शिवसेना औषधालाही ठेवणार नाही, असे सांगणारेच शिल्लक आहेत की नाहीत माहीत नाही. शिवसैनिकांची खरी ताकद शाखा आहे. तेच आपले मंत्रालय आहे. इथे आलेल्यांना न्याय दिला पाहिजे. आता अरे, तुरे, कारे म्हणणारे शिवसैनिक तयार झाले आहेत. असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी शिवसैनिकांना, तालुकाप्रमुखांना वेळ दिला पाहिजे. एवढा निधी कधीच कोणी आणला नाही, तेवढा निधी पालकमंत्र्यांनी आणला आहे. फक्त शिवसैनिकांना थोडा वेळ द्या. त्या जोरावर कणकवलीचा आमदारही शिवसेनेचाच निवडून येईल, असा विश्वास अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.

नारायण राणे यांनी केलेला अपमान विसरणार नाही

भाजपाला सन्मान देणारे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. तर शिवसेनेला पाण्यात पाहणारे भाजपाचे आजचे नेते आहेत, असे देसाई यांनी सांगत भाजपाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. यापुढे आम्ही भाजपाशी युती करणार नसल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुखांना धृतराष्ट्र म्हणून त्यांचा केलेला अपमान शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत.

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे राणे जैतापूरचा प्रकल्प होण्यासाठी पायघड्या घालीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राणे यांनी काढलेल्या पक्षाचे स्वाभिमान हे नाव योग्य नसून हा पक्ष स्वार्थी माणसांचा पक्ष आहे. राणेंनी आमदार कोळंबकर यांना मंत्री करा असे कधीही सांगितले नाही. फक्त स्वत: मंत्री होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असाही टोला देसाई यांनी राणेंना लगावला.
गेले काही दिवस राजकारणापासून दूर असणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीची सभागृहात चर्चा होती.

Web Title: Sindhudurg: Shiv Sena opposes Green Refinery project: Subhash Desai, vote expressed in Shiv Sena rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.