सिंधुदुर्ग : आंबा उत्पादकांवर अन्याय होऊ देणार नाही : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:11 PM2018-05-22T16:11:55+5:302018-05-22T16:11:55+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक व शेतकऱ्यांचे यावर्षी खराब हवामान तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या या आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असे समजून हुकूमशाही पद्धतीने आंबा कॅनिंगसाठी घेणाऱ्या कंपन्या कमी दर देत आहेत.

Sindhudurg: Nitesh Rane not to be averse to mango growers: Nitesh Rane | सिंधुदुर्ग : आंबा उत्पादकांवर अन्याय होऊ देणार नाही : नीतेश राणे

सिंधुदुर्ग : आंबा उत्पादकांवर अन्याय होऊ देणार नाही : नीतेश राणे

Next
ठळक मुद्देआंबा उत्पादकांवर अन्याय होऊ देणार नाही : नीतेश राणेसंबंधित कंपन्यांविरोधात ठाम भूमिका घ्यावी लागेल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक व शेतकऱ्यांचे यावर्षी खराब हवामान तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या या आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असे समजून हुकूमशाही पद्धतीने आंबा कॅनिंगसाठी घेणाऱ्या कंपन्या कमी दर देत आहेत. ही पिळवणूक वेळीच थांबली नाही तर संबंधित कंपन्यांविरोधात आम्हांला ठाम भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी येथे दिला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश राणे, संदीप साटम आदी उपस्थित होते.

यावेळी नीतेश राणे पुढे म्हणाले, यावर्षी आंबा उत्पादन कमी आहे. त्यामुळे आंबा उत्पादक व शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशा स्थितीत कॅनिंगसाठी घेण्यात येणाऱ्या आंब्याचा दर चांगला असणे आवश्यक होते. त्यासाठी कॅनिंगला आंबा घेणाऱ्या कंपन्यांशी मी संपर्क केला होता.

तसेच दर जास्त देण्याबाबत बोलणे झाले होते. मात्र, तरीही आता संबंधित कंपन्यांकडून कमी दर दिला जात आहे. त्यामुळे या कंपन्यांनी संवाद साधून योग्य दर दिला नाही तर आंबा उत्पादक व शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व ताकद उभी करू. कोणावरही कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही.

लवकरच सर्व आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन संबंधित कंपन्यांबाबत काय भूमिका घ्यायची ते ठरवून ती जाहीर करण्यात येईल. येथील आंबा हे प्रमुख पीक आहे. त्याचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादक व शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. असे झाल्यास मराठवाडा तसेच विदर्भाप्रमाणे सिंधुदुर्गातही आत्महत्या होतील.

त्याला जबाबदार कोण?

समुद्रामध्ये एलईडी लाईट लावून मच्छिमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे, असे सांगून सिंधुदुर्गातील अनेक राजकीय नेते त्याचे श्रेय घेत आपली पाठ थोपटून घेत आहेत. मच्छिमारांच्या समस्यांबद्दल विधिमंडळात विषय मी मांडायचा आणि त्याचे श्रेय मात्र दुसऱ्यांच राजकीय व्यक्तींनी घ्यायचे याला काय म्हणायचे?

फुकटचे श्रेय घेणाऱ्या या व्यक्तींनी शासनाने घातलेल्या या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होते आहे का? हे आधी पहावे. अशी मच्छिमारी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्षच अस्तित्वात नाही. तसेच अधिकारीही कमी आहेत. अशी स्थिती असताना नियम तोडणाऱ्यांना शिक्षा कोण करणार? याचे उत्तर श्रेय घेणाऱ्यांनी आधी द्यावे.

नियमबाह्य मच्छिमारी करून कायदा तोडण्याचा प्रकार यापुढेही असाच सुरू राहिला तर मच्छिमारांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल. त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल. यावेळी कायदा तोडणाऱ्या बोटीची जबाबदारी आमची नसेल. हे संबंधितांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही नीतेश राणे यांनी यावेळी दिला.

कणकवलीतील आचरा रोडवरील वाहतूक कोंडीविषयी मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक पोलीस ठेवून महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करावी अशी मागणीदेखील केली आहे.

नगरपंचायतीच्या माध्यमातून वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून देऊन महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आचरा बायपासचे काम जलदगतीने होण्यासाठी पोस्टाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचे काम लवकरच करण्यात येईल.

नगरपंचायतीचे पार्किंगचे आरक्षण विकसित करताना कोणीही लोकांच्या आयुष्याशी खेळू नये. असे जर कोणी करीत असेल तर आमचा त्याला विरोधच राहील, असेही नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्गचेपालकमंत्री निष्क्रिय!

अलीकडेच जिल्ह्यात वादळी वाऱ्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात येईल. या नुकसानीचा पंचनामा अजून पूर्ण व्हायचा आहे.

जिल्हा प्रशासन ढिम्म असून ते जागचे हलत नाही. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री निष्क्रिय आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. अधिकाऱ्यांना कोणाचाच धाक नाही. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे कंत्राटदार बेबंदशाही करीत आहेत.

काम करीत असताना नळयोजनेची पाईपलाईन तोडणे, दूरसंचारची केबल तोडणे असे प्रकार होत असताना त्याचा जाब या कंत्राटदारांना कोणीच विचारणारा नाही. जनतेच्या समस्या सोडविणे ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे? हेच या पालकमंत्र्यांना समजत नाही, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.
 

Web Title: Sindhudurg: Nitesh Rane not to be averse to mango growers: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.