Sindhudurg: In the last phase of the Kukeshwara Yatra Yatra, the journey will be in the 13th-15th period | सिंधुदुर्ग : कुणकेश्वर यात्रोत्सव नियोजन अंतिम टप्प्यात, यात्रा १३ ते १५ कालावधीत
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर मंदिर यात्रोत्सवानिमित्त सजविण्यात आले आहे. (छाया : वैभव साळकर)

ठळक मुद्देकुणकेश्वर यात्रोत्सव नियोजन अंतिम टप्प्यातयात्रा १३ ते १५ कालावधीतभाविकांच्या गर्दीत होणार वाढपुंडलिक नाणेरकर यांची माहिती

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या दिमाखात होणार आहे. त्यानिमित्ताने नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर यांनी दिली.

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. त्यादृष्टीने देवस्थान ट्रस्टचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामध्ये भव्यमंडप व्यवस्था, अखंडित विद्युत पुरवठा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यायी रस्त्याची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्यप्रकारे नियोजन केले आहे.

यात्रा परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मंदिर परिसरात आवश्यक ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जम्बो कॅमेऱ्याद्वारे समुद्रकिनारा, सागरी महामार्ग आदी परिसरावर देखरेख करणे सोपे जाणार आहे.

विशेष देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि सागरी सुरक्षा दल असणार आहे. समुद्र किनाऱ्यांवरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था आणि पुरूष व महिलांकरिता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे.

प्रांताधिकारी निता शिंदे यांनी यात्रा नियोजन बैठक घेऊन व प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करून उणिवांची पूर्तता करण्याचे संबंधित खात्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी सचिव नरेश जोईल, सदस्य संदीप आचरेकर, जयदास नाणेरकर, माजी विश्वस्त सुधाकर वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम, रावजी वाळके, शैलेश बोंडाळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एलईडी स्क्रीनव्दारे होणार प्रक्षेपण

यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात आणि संपूर्ण देशभर ६ डिव्हाईन (४७), मस्तमराठी (५१६), कॅम्पस (१२५), उत्सव (१२१) या चॅनेलच्या माध्यमातून होणार आहे. तसेच संपूर्ण यात्रा परिसरामध्ये एलईडी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

श्री देव कुणकेश्वर भेटीकरिता व तीर्थस्नानासाठी आतापर्यंत श्री स्वयंभू रवळनाथ (कणकवली), श्री आरेश्वर-पावणादेवी (आरे-देवगड), श्री रवळनाथ (वायंगणी मालवण) यांनी नियोजनाच्यादृष्टीने देवस्थानशी संपर्क साधलेला आहे. त्याचप्रमाणे इतर येणाऱ्या देवस्वाऱ्यांच्या कमिट्यांनी नियोजनाच्यादृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
 


Web Title: Sindhudurg: In the last phase of the Kukeshwara Yatra Yatra, the journey will be in the 13th-15th period
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.