Sindhudurg: The fishermen will get rid of the fishermen's boats, the result of the ominous storm | सिंधुदुर्ग : मच्छिमारांच्या फसलेल्या नौकाही बाहेर काढणार, ओखी वादळाचा परिणाम

ठळक मुद्दे मांडवीच्या मुखाशी साचलेला गाळ काढणे सुरूसंरक्षक भाग खचला

वेंगुर्ले : ओखी वादळामुळे मांडवी खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाने सुरु केले आहे. त्यामुळे खाडीतील गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला असून खाडीचे मुख खुले होत असल्याने मच्छिमारांच्या नौकाही आता पूर्ववत खाडीत स्थिरावणार आहेत.

वेंगुर्ले किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा बसल्याने मांडवी खाडीत गाळ साचून चाळीस बोटी त्यात फसल्या होत्या. खाडीचे मुख गाळाने पूर्णपणे भरल्याने येथील मच्छिमारांच्या छोट्यामोठ्या नौका समुद्र्रात असुरक्षित ठेवाव्या लागत होत्या.

यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मुंबई येथील मेरीटाईम बोर्डाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने मांडवी खाडीतील गाळ काढण्याचे काम वेंगुर्ले मेरीटाइम बोर्डामार्फत सुरु केले आहे. त्यामुळे गाळात फसलेल्या नौका बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला आहे.

वेंगुर्लेतील किनारपट्टीवर ओखी वादळाने उद्भवलेल्या गंभीर घटनेनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मतदार संघाचे आमदार असूनही रात्रीच्या वेळी धावती भेट देऊन पाहणी केली होती. तर नवाबाग येथे त्यांनी भेट दिली नसल्याने तेथील मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली होती.

भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेली यांनी ५ डिसेंबर रोजी नुकसानग्रस्त नवाबाग मच्छिमार वस्ती व मांडवी किनारपट्टीला भेट देऊन पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे माजी आमदार राजन तेली यांच्यासमवेत वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीने मांडवी खाडीतील गाळ तातडीने काढण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती.

त्यानुसार मेरीटाइम बोर्ड मुंबईच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश दिले होते. बोर्डाचे सर्व्हेयर प्रकाश चव्हाण यांनी खाडीची पाहणी करुन अहवाल सादर केला. त्यानुसार तीन लाख रूपये खर्च करुन येथील गाळ काढून खाडीचे मुख खुले करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच गाळात फसलेल्या नौका काढल्याचे कामही सुरू केले आहे.

मच्छिमारांना बारा तास समद्र्रात प्रतीक्षा करावी लागत होती. हा प्रश्न गाळ काढल्याने तात्पुरता सुटला तरी कायमस्वरूपी पाणी प्रवाहित ठेवण्याबाबत उपाययोजना केल्यास खाडी सुरक्षित होऊन मच्छिमारांना नौका सुरक्षित ठेवण्याबरोबर नौकाविहाराने रोजगारही मिळेल, असे मत आधुनिक रापण संघ अध्यक्ष दादा केळुसकर यांनी व्यक्त केले.

सुमारे ३०० मीटर खाडीतील गाळ तीन फूट खोल व १० मीटर लांबीचा काढला जाणार आहे. हे काम ओखी वादळ आपत्कालीनमधील असल्याचे वेंगुर्ले मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनर यांनी सांगितले.

संरक्षक भाग खचला

वेंगुर्ले बंदराला ओखी वादळामुळे बंदराकडील संरक्षक भाग अजस्त्र लाटाने खचला, तर मच्छिमार सुरक्षितपणे ज्या मांडवी खाडीत नौका ठेवतात, ते मुख गाळाने भरले. परिणामी खाडीतील सुमारे चाळीस नौका गाळात फसल्या होत्या. याबाबत वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले मत्सविभाग, मेरीटाइम बोर्ड यांनी पंचनामा करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.