सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहिणींची घरगुती मसाल्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:56 PM2018-06-09T13:56:53+5:302018-06-09T13:56:53+5:30

जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागात पावसाळ्यात गरम मसाला व लाल तिखट मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट चवदार रुचकर, गरम व हिरवा मसाला तयार करण्याच्या कामाची लगबग सुरू आहे.

In Sindhudurg district, domestic help for domestic spices | सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहिणींची घरगुती मसाल्यासाठी लगबग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहिणींची घरगुती मसाल्यासाठी लगबग

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहिणींची घरगुती मसाल्यासाठी लगबगपदार्थांचे भाव वाढल्याने फटका रुचकर मसाल्याच्या सामानाची जमवाजमव करताना कसरत

बाळकृष्ण सातार्डेकर 

रेडी : जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागात पावसाळ्यात गरम मसाला व लाल तिखट मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट चवदार रुचकर, गरम व हिरवा मसाला तयार करण्याच्या कामाची लगबग सुरू आहे.

चवदार मसाला बनविण्यासाठी गृहिणींची धावपळ चालली आहे. मात्र, रूची निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मसाला पदार्थांची आवक कमी झाल्याने या पदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना मसाल्याच्या सामानाची जमवाजमव करताना कसरत करावी लागत आहे.

मे महिन्याच्या सुटीत आलेले चाकरमानी गावठी मसाला आपल्या गावाकडे बनवितात. ग्रामीण भागात विशेषत: कोकणपट्ट्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाळ्याची बेगमी म्हणून या परिसरातील तयार केलेली गावठी मिरची व घाटमाथ्यावरून आलेली घाटी मिरची कुटून उत्कृष्ट तिखट-गरम व हिरवा मसाला तयार केला जातो. हे काम सध्या जोरात सुरू असल्याने मसाला कांडप गिरणी गजबजलेल्या दिसत आहेत.

सध्या रेडी, आरोंदा, शिरोडा, मळेवाड, धाकोरा, मातोंड, तुळस, तळवडे, आसोली, टांक-आरवली, अणसूर, न्हैचिआड या परिसरातील गावठी मिरची व हिरव्या मसाल्याची आवक वाढली आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर, बेळगाव, गडहिंग्लज, कारवार, गोवा राज्यातील व्यापारी मिरचीसह मसाल्याचे पदार्थ स्थानिक आठवडा बाजारपेठेत विक्री करीत आहेत. तसेच कांदे, सुके खोबरे, सुक्या मच्छिसह पावसाळ्यासाठी लागणाऱ्या अन्य वस्तंूच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

गरम, चवदार मसाला बनविण्यासाठी लाल मिरचीसोबत धणे, जायफळ, खसखस, काळी मिरी, जिरे, लवंग, हळकुंड, जायपत्री, रामपत्री, दालचिनी, मसाला वेलची, तमालपत्री, दगडफूल, सफेद मिरी या पदार्थांचा वापर केला जातो.
जिल्ह्यात मसाला उद्योगांकडे अनेक महिला वळल्यामुळे बचतगटांच्या माध्यमातून बँकांनीही मसाला उद्योगाला अर्थसहाय्य केल्याने आता जिल्ह्यात अनेक मसाला उद्योग निर्माण झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याव्यतिरिक्त कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी येथून चवदार मसाले बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागले आहेत. मालवणी मसाल्याला जास्त मागणी असल्यामुळे महिला मालवणी मसाला उद्योगाकडे वळल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात मालवणी मसाल्याला मोठी मागणी असते.

अनेक महिला आज मसाला उद्योगावर आपली उपजीविका करीत आहेत. अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. काही बचतगटही मसाला उद्योगांकडे वळले आहेत. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अनेक महिला मसाला उद्योगाकडे वळल्या आहेत.

अनेक ठिकाणी अद्यापही घरी मसाला तयार केला जातो. बाजारपेठेत तिखट मसाला, मटण मसाला, मच्छी मसाला आदी मसाल्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे महिला उद्योजिका मसाला उद्योगाकडे वळल्या आहेत.


मिरची पीक घेण्याची पद्धत

गावागावात आपल्या परसामध्ये फेबु्रवारी-मार्च महिन्याच्या दरम्यान गावठी लाल मिरचीचे पीक घेतले जाते. यासाठी शेतात नांगरणी करून वाफे बनवावे लागतात. चांगल्या प्रतीच्या बिया घालून त्यांना योग्य प्रमाणात खत-पाणी घालावे लागते. तयार झालेल्या मिरच्यांचे देठ काढून त्या उन्हात सुकवून विक्रीसाठी आणल्या जातात. सध्या शिरोडा-आरोंदा बाजारपेठेत मिरची व्यावसायिक मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

मिरचीचे प्रति किलो दर

  1. कोकणी गावठी लाल मिरची - २८० ते ३३० रुपये.
  2.  तिखट मिरची - १४० रुपये.
  3.  लाल बेडगी मिरची - १७० रुपये.
  4. लवंगी तिखट मिरची - १६० रुपये.
  5. घाटमाथ्यावरील काश्मिरी मिरची - २०० रुपये.
  6.  संकेश्वरी मिरची - २०० रुपये.
  7. मसाला कांडप प्रतिकिलो - ३० रुपये.
     

पंचतारांकित हॉटेलमध्येही वापर

गावठी मिरचीचा भाजलेला मसाला व हिरवा मसाला सर्वसामान्यपणे घरामध्ये तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये तिखट सांबार, आमटी, कालवण, उसळ-कुर्मा, विविध पालेभाज्यांमध्ये वापर केला जातो. तसेच हिरवा मसाला चवदार मच्छी कढी, मासे भाजणे यासाठी वापरला जातो.


हॉटेलमधील उसळ, कुर्मा, सांबार, चटणी आदी लज्जतदार पदार्थांसाठी गावठी मिरचीच्या मसाल्याचा वापर केला जातो. गावठी मिरची व गरम मसाल्यांच्या पदार्थांना ग्राहकांची अधिक पसंती आहे.
-दिलीप वस्त,
हॉटेल व्यावसायिक, रेडी



गावठी लाल मिरचीपासून बनविलेला मसाला तसेच गरम मसाल्यांपासून बनविलेले पदार्थ चवदार असतात. त्यामुळे गावठी मिरचीस अधिक पसंती मिळते. मात्र, सध्या मसाला पदार्थांच्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींना कसरत करावी लागत आहे.
-पूजा रेडकर, गृहिणी
 

Web Title: In Sindhudurg district, domestic help for domestic spices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.