सिंधुदुर्ग : गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:14 PM2018-09-17T14:14:51+5:302018-09-17T14:20:22+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, कित्येक पुरोहितांचे अनंत चतुर्थीपर्यंतचे बुकिंग श्री गणेश चतुर्थीपूर्वीच करण्यात आले आहे.

Sindhudurg: Book of Purohita for the worship of Ganesh Chaturthi, demand increased | सिंधुदुर्ग : गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली

सिंधुदुर्ग : गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली

Next
ठळक मुद्दे गणेशचतुर्थीतील पूजेसाठी पुरोहितांचे बुकिंग, मागणी वाढली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनंतचतुर्थीपर्यंत घरोघरी धार्मिक कार्यक्रम

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना तसेच प्रतिष्ठापणा केल्यानंतर होणाऱ्या पूजा, गणेश याग, गण होम असे विविध धार्मिक विधी केले जातात. त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा, ब्राह्मण भोजन असेही धार्मिक कार्यक्रम घरोघरी केले जातात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, कित्येक पुरोहितांचे अनंत चतुर्थीपर्यंतचे बुकिंग श्री गणेश चतुर्थीपूर्वीच करण्यात आले आहे.

सध्या पौरोहित्य करत असणाऱ्यांपैकी बहुतेकांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांची पुढची पिढी या क्षेत्रात काम करण्यास अनुत्सुक असल्याचे सांगितले जाते. सिंधुदुर्गात घरगुती गणपतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे धार्मिक विधी करताना गणेशोत्सव काळात पुरोहितांची अनेकवेळा कमतरता भासत असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी तर पहाटे लवकर पुजेला सुरुवात करूनसुध्दा अनेक पुरोहितांना रात्रीचे आठ वाजत असतात. सर्वात आधी आपल्या घरी पुरोहित यावेत यासाठी गणेशभक्तांची धावपळ चाललेली असते.

गणेशोत्सव काळात पुरोहितांच्या कामाचा खूप व्याप असतो. या काळात त्यांना पूजेच्या कामातून उसंत मिळणेही कठीण असते, त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचे अगोदरच नियोजन केले जाते. त्यामुळे त्यांचा ताण काहीसा कमी होतो.

या पार्श्वभूमीवर काही पुरोहितांनी सांगितले की, पौरोहित्य शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना वेदपाठ शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे आगामी काळात निश्चितच पुरोहितांच्या संख्येत वाढ होईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या ५ तालुक्यांमध्ये बहुतांश घरांमध्ये पुरोहितांकडून गणेशाची पूजा केली जाते. कणकवली, देवगड व वैभववाडी या ३ तालुक्यांमध्ये काही ठराविक घरांमध्ये पुरोहितांकडून पूजा करून घेतली जाते. परंतु पुरोहितांची संख्या कमी असल्यामुळे सर्व गणपतींची पूजा त्यांच्याकडून करून घेणे शक्य नसल्यामुळे अनेक गणेशभक्त स्वत:च गणपतीची पूजा करतात.

आज समाजात मुळातच पुरोहितांची संख्या कमी आहे. सर्वांचे गणपती एकाच दिवशी येत असल्यामुळे एका पुरोहिताला सर्व गणपतींची पूजा करणे कठीण आहे. त्यामुळे जे स्वत:च गणपती पूजतात ते एका दृष्टीने पुरोहितांच्या दृष्टीने चांगले आहे.

अनेक गणेशभक्त करतात स्वत:च पूजा

पुरोहितांकडूनच गणपतीची पूजा करून घेण्याची काही गणेशभक्तांची मानसिकता आहे. तर काही गणेशभक्त स्वत:च गणपतीचे पूजन करीत आहेत. मात्र त्यांच्या घटत्या संख्येचा विचार करता पुरोहितांकडून गणपतीची पूजा करून घेणे ही प्रथा आता कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sindhudurg: Book of Purohita for the worship of Ganesh Chaturthi, demand increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.