सिंधुदुर्ग : नेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 03:48 PM2018-03-21T15:48:20+5:302018-03-21T15:48:20+5:30

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करेपर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची गुऱ्हाळे सुरूच होती. एकीकडे शत-प्रतिशत भाजपाचा नारा देणारी नेतेमंडळी शिवसेनेसोबत कशी काय गेली?

Sindhudurg: Alliance of leaders, fear of victory for workers, 100% slogans slogan | सिंधुदुर्ग : नेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले

सिंधुदुर्ग : नेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले

Next
ठळक मुद्देनेत्यांची युती, कार्यकर्त्यांना विजयाची भीती, शत-प्रतिशतचे नारे विरले सर्वसामान्यांच्या चर्चेने निवडणूक वातावरण तापतेय....

महेश सरनाईक

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करेपर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची गुऱ्हाळे सुरूच होती. एकीकडे शत-प्रतिशत भाजपाचा नारा देणारी नेतेमंडळी शिवसेनेसोबत कशी काय गेली?

दुसरीकडे भाजप हाच आपला एक नंबरचा शत्रू पक्ष असल्याची वल्गना करणारी शिवसेना भाजपच्या दावणीला कशी काय बांधली गेली? अशी राजकीय चर्चा आता सर्वसामान्य शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे. त्यामुळे नेत्यांचे जरी सत्ता केंद्रस्थानी मानून मनोमिलन झाले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी पसरलेली जाणवत आहे.

कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला चौथी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन ते तीन महिने अगोदरपासून कणकवलीत निवडणूकपूर्व वातावरण तापायला सुरुवात झाली होती. यात स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि भाजप या तिघांनीही जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभही केला होता.

वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय असो त्या स्थितीत या तिन्ही पक्षांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढविणार असा पवित्रा घेऊनच आखणी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे यावर्षीची निवडणूक अतिशय रोमहर्षक होणार असल्याची चिन्हे अगोदरपासूनच जाणवत होती.

मात्र आता प्रत्यक्षात निवडणूक लढविण्याची पाळी आली तेव्हा शिवसेना आणि भाजपने एकत्रित येत युतीचे रणशिंग फुंकले आहे. युती करावी असे स्थानिक नेतृत्वाला का वाटले? कारण त्यांना स्वतंत्ररित्या निवडणूक लढविल्यास आपल्या मतांची विभागणी होईल आणि आपला प्रतिस्पर्धी असणाऱ्या स्वाभिमानला आपोआप संधी मिळेल, असे वाटत होते.

अनेकांच्या मनसुब्यावर पाणी

केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना विस्तारण्याची संधी म्हणजे निवडणूक. पाच वर्षांनी एकदा संधी मिळणार म्हणून कणकवली शहरातील अनेक शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते आनंदी होते. त्यातच शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्यासाठीच मोर्चेबांधणी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदेश बांदेकर यांचा प्रसिद्ध होम मिनिस्टर कार्यक्रमही कणकवलीत घेण्यात आला.

या कार्यक्रमालाही महिलांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर उतरेल, असे कार्यकर्त्यांना मनोमन वाटत होते. त्यामुळे इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर आखणी करायलाही सुरुवात केली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संधीची वाट पहात बसलेल्या काही जणांना तर मग आयत्यावेळी काँग्रेसमधून किंवा गावविकास आघाडीमधून निवडणूक रिंगणात उतरण्याची पाळी आली.

राणेंनी नेहमीच दिली कार्यकर्त्यांना संधी

निवडणूक म्हटली की हार, जीत ही आहेच. परंतु कार्यकर्ते निर्माण करायचे असल्यास किंवा त्यांना स्वतंत्ररित्या उभे करायचे असल्यास त्यांना या ना त्या कारणाने संधी देण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात सिंधुदुर्गात अनेक कार्यकर्ते घडविले. अनेकांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळेच कार्यकर्त्यांची मोठी फळी ते निर्माण करू शकले.

काही ठराविक नेतेमंडळी वगळता जर चक्राकार पद्धतीने प्रत्येकाला संधी मिळाली तर त्या संधीतून तो आपले कर्तृत्व दाखवू शकेल अशा भावनेतून म्हणा किंवा जबाबदारीची जाणीव करून देत राणे यांनी प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना अगदी ताकदीनीशी संधी दिल्यामुळे कार्यकर्तेही मन लावून काम करू लागले. त्याचा फायदा निवडणुकीत विजय मिळविणे त्यांना सोपे गेले. त्यातूनच गेल्या २५ वर्षांत राणे आणि विजय असे समीकरणही बनले होते.

मागील काही निवडणुकांमध्ये त्यात खंडही पडला. नारायण राणे किंवा त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा पराभवही झाला. मात्र, असे असतानाही राणे यांनी खचून न जाता कार्यकर्त्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांना प्रत्येकवेळी संधी देण्याची त्यांची राजकीय खेळी कायम ठेवली. कणकवलीतदेखील यावेळी राणे यांनी संजय कामतेकर, संजय मालंडकर यांसारख्या जुन्या सहकाºयांना संधी दिली आहे. त्यामुळे त्याबाबतचा एक वेगळा मेसेज सर्वांसमोरच गेला.

मैदानात उतरण्यापूर्वीच आत्मविश्वास गमावला

शिवसेना आणि भाजपने स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात उतरून जनमत आजमावणे गरजेचे होते. त्यातून लोकांनी कौल त्यांच्या बाजूने दिला असता तर त्यानंतर युती करणे क्रमप्राप्त झाले असते. तसे पाहिल्यास विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप स्वंतत्ररित्या लढले होते आणि मग युती करून राज्य सरकारमध्ये ते सामील झाले आहेत. परंतु युती करून विधानसभेच्यावेळी ते लढले असते तर बहुतांशी कार्यकर्ते नाराज झाले असते. त्यांना निवडणूक लढविण्याची संधीही मिळाली नसती. तसाच काहीसा प्रकार आता कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत झालेला आढळत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच या दोन्ही पक्षांनी आपला आत्मविश्वास गमावल्याचे जाणवले. दोन्ही पक्षांना आणि नेतृत्वाला युती व्हावी, असे ज्यावेळी वाटायला लागले त्याचवेळी त्यांच्या मनात विजयाबाबत शंकेची पाल चुकचुकत होती.


 

Web Title: Sindhudurg: Alliance of leaders, fear of victory for workers, 100% slogans slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.