शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे वावडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:55 PM2017-10-26T17:55:49+5:302017-10-26T18:02:48+5:30

 नेत्यांची वैभववाडीबाबतची भूमिका सच्चा शिवसैनिकांच्या खच्चीकरणास कारणीभूत ठरत असून त्याचा परिणाम विकासावर होताना दिसत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास स्वबळाचा हुंकार देणा-या शिवसेनेवर आगामी लोकसभेला निश्चितच पश्चाताची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Shiv Sena leaders are rich in Vaibhavade! | शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे वावडे !

शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे वावडे !

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाबरोबरच संघटना वाढीकडे दुर्लक्ष सच्चा शिवसैनिकांच्या मनोबलावर होतोय परिणाम

प्रकाश काळे

वैभववाडी  , दि. २६ : नेत्यांची वैभववाडीबाबतची भूमिका सच्चा शिवसैनिकांच्या खच्चीकरणास कारणीभूत ठरत असून त्याचा परिणाम विकासावर होताना दिसत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास स्वबळाचा हुंकार देणा-या शिवसेनेवर आगामी लोकसभेला निश्चितच पश्चातापाची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेचा संघटनात्मक आलेख जिल्ह्यात उंचावत असताना शिवसेना नेतृत्वाला वैभववाडी तालुक्याचे वावडे असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सत्तेचे अर्धे वाटेवरी असूनही शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे संघटन आणि विकासाकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशाचा लाभ उठविण्यात शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत पुरती अपयशी ठरली.

काँग्रेसमध्ये गेलेल्या काहींनी राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा भगवा हाती घेतला. त्यामुळे वैभववाडी तालुक्यात शिवसेनेला पुन्हा थोडीफार उभारी आली. फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे जिल्हा परिषदेला एक आणि पंचायत समितीला एक सदस्य निवडून आला.

ब-याचा कालावधीनंतर पक्षाला मिळालेल्या त्या यशामुळे तळागाळातील सच्चा शिवसैनिक सुखावला. मात्र, पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्व शिवसैनिकांच्या उत्साहाला बळ देऊ शकले नाही. त्याचा फटका बसून ग्रामपंचायत निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव शिवसेनेच्या पदरी पडला.

केंद्रासह राज्यातील सत्तेचे वाटेकरी असलेल्या शिवसेनेकडे खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यातही पालकमंत्र्यांकडे अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद आणि जिल्हा प्रमुख आमदार अशी सर्व महत्त्वाची नेतेमंडळी आहेत. परंतु, त्यांचा वैभववाडीला तसा काहीच उपयोग होताना दिसत नाही. पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना त्यांच्या मतदार संघाबाहेर पडण्यास वेळच नाही.


 खासदार विनायक राऊत हे जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय बैठका आणि त्यातून सवड झालीच तर मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्लेत फेरफटका मारून निघून जातात. परंतु, त्यांनाही वैभववाडीकडे लक्ष देण्याची इच्छा होत नसल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून उघड होऊ लागले आहे.


वैभववाडी तालुक्यातील विकास कामांसाठी शिवसेनचे कार्यकर्ते पक्षाच्या या तिन्ही नेत्यांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होते. पण एकाही नेत्यांकडून कार्यकर्त्यांची अपेक्षापूर्ती होण्याची लक्षणे नाहीत. पालकमंत्री केसरकर गेली तीन वर्षे नापणे धबधब्याचा ह्यविकासह्ण करीत आहेत. परंतु, तेथे अजून एकही वीट लागलेली दिसत नाही.

जिल्हा परिषद निवडणुकी पुर्वी मुख्यमंत्री सडक योजनेच्या तालुक्यातील नावळे सडुरे व नापणे रस्त्यांच्या नुतनीकरणाचे पालकमंत्र्यांनी नारळ फोडले. ती कामे नेमकी केव्हा होणार याचीही कल्पना कुणाला नाही. तर खासदार विनायक राऊत यांच्या सह्याद्री पर्यटन विकास योजनेचा कुणालाच थांगपत्ता लागलेला नाही.

तालुक्यातील भारत संचारच्या मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडालेला असताना नव्याने मंजूर केलेल्या २५ पैकी ३ फोर-जी मोबाईल टॉवर वैभववाडी तालुक्यात होणार असल्याचे खासदार राऊत गेले वर्षभर सांगत आहेत.
परंतु, अस्तित्वात असलेली सेवा सुधारण्याच्या कार्यकर्ते आणि जनतेच्या मागणीकडे त्यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तर जिल्हाप्रमुख असलेले आमदार वैभव नाईक यांनी स्वत:च्या मतदारसंघातील दोन तालुक्यांनाच आपले विश्व समजून बसले आहेत.


संपर्कप्रमुखही त्याच वाटेवर

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांचे वैभववाडी तालुक्याकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी समन्वयकाची भूमिका बजावणे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते.

तालुक्यात माजी सभापती जयेंद्र रावराणे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, अशोक रावराणे, दीपक पाचकुडे यांसह स्थानिक पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते पक्ष संघटन वाढविण्यासाठी झटत आहेत. परंतु, विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून काही महिन्यांपूर्वी कणकवली विधानसभा कार्यक्षेत्रात विशेष सक्रिय झालेल्या दुधवडकरांनी ग्रामपंचायत निवडणुक जाहिर झाल्यावर अचानक दडी मारली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आशेचा किरणही मावळला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील अपयशाचे दुधवडकरही तितकेच वाटेकरी आहेत.

पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला

शिवसेना नेत्यांच्या या अशा वागण्यामुळे सत्ता असूनही तालुक्यातील विकास कामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांचे मनोबल खचू लागले आहे. त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होत असल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.

तालुक्यात राणे समर्थकांचे प्राबल्य असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकेक जागा जिंकल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. परंतु, जिल्ह्याच्या ठराविक भागात गुंतलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा फायदा संघटना बांधणीसाठी करुन घेता आलेला नाही.

इतकेच काय तर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडेही खासदार, पालकमंत्री जिल्हाप्रमुख लक्ष देवू शकले नाही. त्यामुळेच शिवसेनेला एकही सरपंच निवडून आणू शकले नाहीत. नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे पदरी पडलेला नामुष्कीजनक पराभव सच्चा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे.

Web Title: Shiv Sena leaders are rich in Vaibhavade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.