ठळक मुद्देजिल्हा परिषद आढावा बैठक; सरपंच, ग्रामसेवकांनी समन्वय साधावाविविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक

सावंतवाडी : गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वय साधून कामाबाबत पाठपुरावा केल्यास गावचा विकास शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपले सहकार्य राहणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी येथे मंगळवारी सांगितले.

येथील तालुका स्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सभापती रवींद्र मडगावकर, उपकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, उपसभापती निकिता सावंत, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, रोहिणी गावडे, श्वेता कोरगावकर, पंचायत समितीसदस्य पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, रूपेश राऊळ, मेघश्याम काजरेकर, आदी उपस्थित होते.यावेळी विविध विकासकामांबाबत उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. यामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये अनेक गावांत असलेली राजकीय दुफळीही दिसून आली, तर ज्या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या नाहीत, त्या ग्रामपंचायतींनी तत्काळ त्यांची पूर्तता करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा यावेळी शेखर सिंह यांनी दिला.बांदा-नेतर्डे-गाळेल या मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेला रस्ता एका महिन्यातच वाहून गेला. याबाबत उपसरपंच प्रशांत कांबळी यांनी लक्ष वेधले असता चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. विलवडे येथे नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या विहिरीत भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पाणीपुरवठा सचिव संतोष दळवी यांनी केला. विहिरीची पूर्ण खोदकाम न करता ठेकेदाराला बिल अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्याचौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवालही आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मळगाव येथील पथदीपांबाबत पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी लक्ष वेधले. या कामाचा प्रस्ताव पाठवीत नसल्याबाबत लक्ष वेधले असता तसा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याबाबत शेखर सिंह यांनी ग्रामसेवकांना सूचना दिल्या. एकंदरीत विविध कामांत राजकीय दुफळी दिसून आली. मात्र, ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वय साधून काम करा, आपले सर्वांना सहकार्य
राहील, असे रेश्मा सावंत यांनी स्पष्ट केले.

विंधन विहीर खोदण्याच्या सूचना

वेर्ले येथे सहा वाड्यांना उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा होतो. त्या ठिकाणी राष्ट्रीय पेयजलमधून पाण्याची सोय करण्यात यावी, नळयोजनेच्या विहिरीलगत असलेल्या नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावर जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी तात्पुरती पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तेथे विंधन विहीर खोदण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.