नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 09:16 PM2018-02-18T21:16:30+5:302018-02-18T21:20:45+5:30

नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले.

The poor work of the Nashawade-Wargaon road was stopped by the villagers | नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद

नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद

googlenewsNext

वैभववाडी(सिंधुदुर्ग): नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले. या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, या कामाचा मक्ता कणकवली तालुक्यातील ठेकेदाराच्या नावे असून, त्यापैकी बंद पाडलेले 2 किलोमीटरचे काम वैभववाडीतील ठेकेदार करीत आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाबाबत जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या 4 किलोमीटर नूतनीकरणासाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची तांत्रिक मंजूर मान्यता आहे. या कामाचा मुख्य ठेकेदार कणकवली तालुक्यातील असून 2 किलोमीटरचे काम करूळचे अनिल पाटील करीत आहेत. पाटील यांनी नाधवडेत नापणे धबधब्याकडे जाणा-या फाट्यापासून नूतनीकरण सुरू केले आहे. दुपारी शिडवणेतील दीपक पांचाळ, शिवसेना उपविभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, सदानंद टक्के, विनोद कोकाटे, आबा टक्के आदी ग्रामस्थ काम सुरू असलेल्या ठिकाणी दाखल झाले. काम योग्य पद्धतीने सुरू नसल्याचा संशय आला.

शिडवणे ग्रामस्थांनी पसरलेली खडी पायाने विस्कटून पाहिली तेव्हा खाली डांबर आढळले नाही. त्यामुळे आणखी 3-4 ठिकाणी खडी विस्कटल्यावर रस्त्यावर डांबरच टाकले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी निकृष्ट काम बंद पाडले. काम बंद पाडल्याचे समजताच काही वेळात पोटमक्तेदार अनिल पाटील कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी शिडवणे ग्रामस्थांनी पाटील यांना निकृष्ट कामाबाबत जाब विचारत रस्त्यावर पसरलेली संपूर्ण खडी बाजूला करून डांबर मारायला भाग पाडले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुमारे 100 मीटरवर पसरलेली संपूर्ण खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा खडी पसरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिडवणेतील काही ग्रामस्थ उशिरापर्यंत कामावर लक्ष ठेवून तेथेच थांबले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या निकृष्ट कामाबाबत जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुट्टीच्या दिवशी पोटमक्तेदाराने नूतनीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे कामावर देखरेख करण्यासाठी अधिकारी किंवा खुद्द मक्तेदारही हजर नव्हता. अशा परिस्थितीत केवळ मजूर या रस्त्याचे काम करीत होते. या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रदीप व्हटकर व शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. परंतु दोन्ही अधिका-यांनी प्रतिसाद दिला नाही.

ठेकेदार चांगला असं ऐकून होतो, पण...
या मार्गाने जात असताना  काम सुरू असलेले पाहिले. तेव्हा आम्हाला संशय आला. त्यामुळे आम्ही गावातील लोकांना बोलावून घेऊन पसरलेली खडी विस्कटून पाहिली त्यावेळी डांबर घातले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण खडी बाजूला करून पुन्हा डांबर मारायला लावले आहे. चांगला ठेकेदार म्हणून नाव ऐकून होतो पण परिस्थिती गंभीर आहे. शासन जनतेच्या सुविधेसाठी पैसे देते. निकृष्ट कामे करून पोटं भरण्यासाठी नव्हे, अशी प्रतिक्रिया शिडवणेचे दीपक पांचाळ यांनी व्यक्त केली.

मजुरांनी चूक केली- अनिल पाटील
या रस्त्याचे 4 किलोमीटरचे काम मंजूर असून, त्यापैकी 2 किलोमीटरचे काम माझ्याकडे आहे. कामाची सुरुवात करून देऊन मी गेलो. त्यानंतर मजुरांनी चुकीच्या पद्धतीने खडी पसरली होती. शिडवणे ग्रामस्थ आल्याचे समजताच मी आलो. आता संपूर्ण खडी बाजूला करून पुन्हा व्यवस्थितपणे करीत आहोत, असे पोटमक्तेदार अनिल पाटील यांनी सांगितले.

Web Title: The poor work of the Nashawade-Wargaon road was stopped by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.