पर्यटन जिल्हा करण्याची केवळ घोषणाच?

By Admin | Published: February 14, 2016 09:54 PM2016-02-14T21:54:18+5:302016-02-15T01:18:10+5:30

रत्नागिरी जिल्हा : पुढाऱ्यांच्या घोषणा केवळ हवेतच

The only district to make tourism? | पर्यटन जिल्हा करण्याची केवळ घोषणाच?

पर्यटन जिल्हा करण्याची केवळ घोषणाच?

googlenewsNext

रत्नागिरी : गोव्याइतकीच पर्यटनाची क्षमता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याकडे पर्यटन वृध्दिच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविण्याच्या घोषणा याआधीही अनेक पुढाऱ्यांनी केल्या आहेत. राज्यमंत्री राम शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात रत्नागिरीत या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे घोषणांनी रत्नागिरीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आतातरी राजकीय नेत्यांनी थांबवावा आणि दिलेल्या वचनाला जागावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना सध्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी जिल्ह्यास फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून उशिराने का होईना विकास होत आहे. तेथे राजकीय वजन असलेले नेते आहेत. गोवा जवळ असल्याने पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा चांगला फायदा झाला. मात्र, रत्नागिरीकडे राजकीय नेत्यांचे पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. केवळ गणपतीपुळेसह काही ठिकाणेच विकसित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये पर्यटनाची क्षमता आहे. त्याकडे आजवर राजकीय नेत्यांचा व शासनाचेही दुर्लक्ष झाल्यामुळे रत्नागिरीच्या विकासाची गती मंदावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या उंचच उंच रांगा आणि पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र असल्याने जिल्ह्याच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. डोंगर दऱ्या, स्वच्छ समुद्र किनारे, सुंदर नागमोडी वळणाच्या नद्या, उन्हवरे, आरवली, तुरळ येथील गरम पाण्याचे झरे, राजापूरमध्ये प्रकट होणाऱ्या गंगेचे ठिकाण, जंगले आणि परशुराम, प्रचितगड, मार्लेश्वर यांसारखे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे धबधबे, पन्हाळेकाजी गुंफा, पाटपन्हाळे व बावनदी व्हॅली, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मार्लेश्वर, हेदवी, हातीस, परशुराम व राजापूर ही धार्मिक ठिकाणे, रत्नागिरीचा ऐतिहासिक थिबा राजवाडा, केळशी, मुरुड, गुहागर, पालशेत, गणपतीपुळे व वेळणेश्वर, मांडवी अर्थात गेटवे आॅफ रत्नागिरी, भाट्ये, गुहागर, आंजर्ला आदी समुद्र किनारे तसेच रत्नदुर्ग, जयगड, हर्णै, पूर्णगड हे सागरी किल्ले, असंख्य किल्ले, मोठे पाटबंधारे प्रकल्प, घाट अशा विपुल निसर्गसौंदर्याने रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा भरभरून आस्वाद घेता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील विविधतेत पर्यटनाची पुरेपूर क्षमता असतानाही ही क्षमता विकसित करण्याकडे स्थानिक नेतृत्व आणि शासनानेही उदासिनताच दाखवली आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनविषयक प्रबोधन, जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर ठराविक पर्यटन केंद्रांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करणे म्हणजे पर्यटन विकास म्हणता येणार नाही. (प्रतिनिधी)


प्रयत्नच नाहीत...
लोकप्रतिनिधींनी पर्यटनासाठी निधी आणण्यासाठी किती प्रयत्न केले, किती निधी सर्वसमावेशक पर्यटन विकासासाठी आला, हा संशोधनाचा विषय आहे.

आराखडा हवा : पर्यटन क्षमतेचा वापर कधी?
जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा विचार करता प्रत्येक तालुक्यात पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे, हे लपून राहात नाही. गणपतीपुळे, पावस, हर्णैसारखी काही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित झाली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्थळांच्या ठिकाणी आणखीही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील तर ती त्याहून चांगली बाब आहे. मात्र, एवढ्या पर्यटन स्थळांच्याच विकासाने जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा वापर होणार नाही. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी, या जिल्ह्याच्या खासदारांनीही केवळ जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास व्हावा, यासाठी एकत्र येऊन त्याचा आराखडा बनवून त्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याचीही तितकीच गरज आहे.

Web Title: The only district to make tourism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.