गोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:22 PM2018-05-18T15:22:44+5:302018-05-18T15:22:44+5:30

सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

The only announcement of free treatment for the patients of Sindhudurg in Goa, free treatment | गोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा

बांबोळीत उपचारासाठी भरणा केलेल्या रक्कमेची पावती.

Next
ठळक मुद्देगोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा  महिन्यानंतरही अंमलबजावणी नसल्याने नाराजी

दोडामार्ग : सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

या आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांनाच खुद्द या कटू प्रसंगास सामोरे जावे लागले असून जोपर्यंत शुल्क भरणा करीत नाही, तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने तब्बल तीन तास रुग्णाला उपचारासाठी ताटकळत रहावे लागले. त्यामुळे जनआक्रोश आंदोलनासाठी बसलेल्यांची दिशाभूल होतेय की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

परराज्यातील रुग्णांवर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार नाहीत. त्यांना ठरवून दिलेली शुल्क आकारणी भरणा करावी लागेल, असा निर्णय दोन महिन्यांपूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतल्यावर त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गवासीयांना बसत होता. त्यामुळे बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन उभारण्यात आले. तब्बल दहा दिवस हे आंदोलन चालले.

अखेर भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदींच्या पुढाकारातून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात बैठक झाली.

या बैठकीत सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक तसेच अती गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, या निर्णयाला महिना उलटला तरी अद्यापही बांबोळीत शुल्क भरून घेतले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

बुधवारी जनआक्रोश आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांना त्या कटू अनुभवास सामोरे जावे लागले. वरक यांचे वडील आजारी असल्याने त्यांना बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जोपर्यंत उपचारासाठी आकारण्यात आलेली रक्कम भरणा केली जात नाही तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे तब्बल तीन तास वरक यांना उपचारासाठी ताटकळत रहावे लागले.

दोन्ही राज्याच्या मंत्र्यांनी मोफत उपचाराची घोषणा केली असताना सुद्धा बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांबाबत असा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे जनआक्रोश आंदोलना दरम्यान केलेल्या घोषणेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आंदोलकांची दिशाभूल तर झाली नाही ना असा संभ्रमही आता निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटले आहे. जनआक्रोश आंदोलनानंतरही बांबोळीत दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही राज्य सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जा

बांबोळीत संदेश वरक यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यावेळी वरक यांनी जनआक्रोश आंदोलनाची आठवण करून देत आपण या आंदोलनाचे संयोजक असल्याचे सांगून रेशनकार्ड उद्या देतो उपचार सुरू करा, असे सांगितले. मात्र, प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकून न घेता पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जा, असे सांगितले.

जन आक्रोशच्या संयोजकांची तातडीची बैठक

बांबोळीत शुल्क आकारण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने जनआक्रोश आंदोलनाच्या संयोजकांची तातडीची बैठक शुक्रवारी (१८ मे रोजी) बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णयासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

 

Web Title: The only announcement of free treatment for the patients of Sindhudurg in Goa, free treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.