निरंजन डावखरेंची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:49 PM2018-05-24T15:49:15+5:302018-05-24T15:51:04+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Niranjan Davkhareen's recommendation from BJP for Konkan Graduate Constituency | निरंजन डावखरेंची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिफारस

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार रामनाथ मोते होते.

Next
ठळक मुद्देनिरंजन डावखरेंची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिफारसफडणवीस यांच्या उपस्थितीत डावखरेंचा भाजपमध्ये प्रवेशमाजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचाही भाजपमध्ये प्रवेश

सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरंजन डावखरे यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यांच्याबरोबरच माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील, आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅड. निरंजन डावखरे यांचे भाजपमध्ये स्वागत केले. ते म्हणाले, कोकणासह ठाणे जिल्ह्यात युवा व धडाडीचे नेते अशी अ‍ॅड. निरंजन डावखरे यांची ओळख आहे. तब्बल तीन दशकांपासून त्यांचे वडील वसंत डावखरे यांची अजातशत्रू म्हणून ओळख होती. ते लोकप्रिय नेते होते. त्यांचीच परंपरा निरंजन यांनी जोपासली आहे.

सहा वर्षांत पदवीधर मतदारसंघात उत्तम कामगिरी केली. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून भाजपला तरुण, तडफदार आणि चांगले नेतृत्व मिळाले असून, त्यांची भाजप वाढविण्यासाठी मोलाची साथ मिळेल. आगामी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांची पक्षाच्या केंद्रीय समितीकडे शिफारस केली असून, ते निश्चितच निवडून येतील."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात विकासकामे सुरू आहेत. या कामांमुळे आपण प्रभावित झालो आहोत. तर कोकण पदवीधर मतदारसंघातील शिक्षक, पदवीधरांबरोबरच विकासाची कामे करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम सकारात्मक भूमिका ठेवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायम विकासकामांना पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, असे निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.

आमदारकीच्या माध्यमातून कोकणात निरंजन डावखरे यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपला कोकणात बळकटी येईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. या वेळी माजी आमदार रामनाथ मोते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी स्वागत केले.

चांगला नेता म्हणून डावखरेंना प्रवेश : मुख्यमंत्री

समाजातील चांगले नेते व चांगल्या व्यक्तींना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. त्यानुसार एक चांगला नेता म्हणून निरंजन डावखरे यांना प्रवेश देण्यात आला आहे, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिले.

रामनाथ मोते यांच्या प्रवेशामुळे डावखरेंची बाजू मजबूत

शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार रामनाथ मोते यांच्या भाजप प्रवेशामुळे अ‍ॅड. निरंजन डावखरे यांची बाजू मजबूत झाली आहे. माजी आमदार मोते यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग आहे. त्यांनी शिक्षक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले होते.

 

Web Title: Niranjan Davkhareen's recommendation from BJP for Konkan Graduate Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.