निर्विवाद वर्चस्वासाठी संघर्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:49 PM2017-10-19T23:49:44+5:302017-10-19T23:49:44+5:30

Need for struggle for unquestioned domination | निर्विवाद वर्चस्वासाठी संघर्षाची गरज

निर्विवाद वर्चस्वासाठी संघर्षाची गरज

Next



सुधीर राणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत. मात्र, राणे समर्थकांचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात शिवसेना व भाजप मुसंडी मारताना दिसत आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आपले वर्चस्व या तालुक्यात कायम ठेवण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, त्या निवडणुकीत शिवसेना व भाजपला आपले खाते खोलता आलेले नसले तरी त्यांची मते निश्चतच वाढली होती. आता तर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाचेही कणकवली तालुक्यावर वर्चस्व आहे. तर काँग्रेसची ताकदच तालुक्यात आता म्हणावी तशी शिल्लक राहिलेली नाही. मात्र, या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने तसेच भाजपने मारलेली मुसंडी पहाता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यादृष्टीने ती चिंतेची बाब असून आपले वर्चस्व तालुक्यावर कायम ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
अर्थात या ग्रामपंचायतीत मतदारांनी अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे. तो त्यांच्या एकंदर कार्यपध्दतीमुळेच आहे. हेही विसरुन चालणार नाही. अनेक वर्ष सरपंच पद भोगणाºया व्यक्तींना गावातील लोकांनी ‘तुम्ही आता थांबा’, तुमच्या जागी दुसºया व्यक्तीला संधी द्या’ असे सांगितले होते. मात्र, ते न थांबल्याने इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी तसेच गावातील लोकांनी एकत्र येत गाव विकास पॅनेल तयार केले होते. या पॅनेलच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढविण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना काही ठिकाणी यश मिळाले आहे. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. ही पार्र्श्वभूमीदेखील महत्त्वाची आहे.
प्रत्यक्षदर्शी पहाता ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे कुंभवडे व वागदे, भाजपचे कासार्डे, घोणसरी, तरंदळे व बिडवाडी, गाव पॅनेलचे हुंबरठ, ओसरगाव, करुळ व हळवल तर खारेपाटण व सातरल ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार , संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, अतुल काळसेकर असे भाजप नेते तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना तालुक्यात आपले वर्चस्व राखायचे असेल तर हे प्रयत्न वाढविणे आवश्यक आहे. शिवसेनेकडूनही आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर पक्षबांधणी करीत आहेत. त्याला काहीसे यश मिळत असले तरी ते पुरेसे नाही. शिवसेनेची ताकद या तालुक्यात वाढत असली तरी अजून गतीची गरज आहे.
कणकवली तालुक्यात समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे समर्थकांनी आपले वर्चस्व या ग्रामपंचायत निवडणुकीत राखले आहे. असे असले तरी वागदे, ओसरगाव, कळसुली, कासार्डे, घोणसरी, बिडवाडी, तरंदळे या ग्रामपंचायतीतील सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. कलमठ मध्ये सरपंच पद राखले असले तरी १७ पैकी १० सदस्य विरोधी असल्याने विकास कामांबाबत निर्णय घेताना सरपंचांना एकप्रकारे कसरत करावी लागणार आहे. खारेपाटण येथे सरपंचपदी अपक्ष रमाकांत राऊत तर कुंभवडे येथे शिवसेनेचे सूर्यकांत तावडे सरपंचपदी निवडून आले आहेत. वागदेत समर्थ विकास पॅनेलला एकही जागा मिळविता आलेले नाही.
वायंगणी सरपंचपदी नीलेश कदम एका मताने विजयी झाले आहेत. ही स्थिती पहाता सर्वच पक्षांना तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संघटना बांधणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होऊ शकेल.
महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर सेना-भाजपची मुसंडी
कलमठमध्ये सरपंच समर्थ विकास पॅनेलचा तर १७ पैकी १0 सदस्य हे शिवसेना- भाजप व अपक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. वागदेत समर्थ विकास पॅनलचा धुव्वा उडाला तर कोंडयेत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीतून सरपंच निवडण्यात आला आहे. तालुक्यात समर्थ विकास पॅनेलने वर्चस्व राखले असले तरी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेना- भाजपकडून मुसंडी मारत विजय प्राप्त करण्यात आला आहे. ही त्यांच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे.
पोस्टल मते ठरली निर्णायक
या ग्रामपंचायत निवडणुकीत पोस्टल मते अनेक उमेदवारांची भाग्य उजळविणारी ठरली आहेत. कसवण- तळवडे येथील प्रशांत सावंत व संजय सावंत यांना प्रत्येकी १२३ अशी समान मते मिळाली होती . मात्र, पोस्टल ३ मते मिळाल्याने प्रशांत सावंत विजयी झाले आहेत. हरकुळ खुर्दमध्येही संतोष काशीराम जाधव हे पोस्टल मतांनी विजयी झाले आहेत. तर कलमठ प्रभाग ३ मध्ये मतदान यंत्रातील मतांमध्ये विश्वनाथ आचरेकर आघाडीवर होते. मात्र, पोस्टल मतांमुळे स्वप्निल चिंदरकर अवघ्या ३ मतांनी विजयी झाले आहेत. या उमेदवारांसाठी पोस्टल मते निर्णायक ठरली आहेत.
प्रस्थापितांना धक्का
काही गावांमध्ये प्रस्थापितांविरोधात कौल देताना मतदारांनी परिवर्तन घडविले आहे. त्यामध्ये शिवडाव येथील बाळा भिसेंविरोधात तर करुळ सरपंच पदासाठी दत्तात्रय फोपे विरोधात कौल दिला आहे. तर अनेक वर्षे हुंबरठ ग्रामपंचायतवर सत्ता असलेल्या दिलीप मर्ये यांना पराभव पत्करावा लागला आहे. वागदे येथील संदीप सावंत व कलमठ येथील निसार शेख या विद्यमान सरपंचाना समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून सदस्य पदासाठी निवडणूक लढविताना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वंदना खटावकर यांना पराभवाचा फटका बसला आहे.

Web Title: Need for struggle for unquestioned domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.