कणकवली सभेत शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरुन सदस्य संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:38 PM2017-10-26T15:38:16+5:302017-10-26T16:00:14+5:30

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलांना रात्री अपरात्री ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. शासकीय रुग्णालयातील जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. अशा संतप्त भावना गुरुवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यानी व्यक्त केल्या.तसेच आरोग्य सेवे बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 Members of the government hospital in Kanakwali are angry | कणकवली सभेत शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरुन सदस्य संतप्त

कणकवली सभेत शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरुन सदस्य संतप्त

Next
ठळक मुद्देकणकवली पंचायत समिती मासिक सभेत सदस्य संतप्त, व्यक्त केल्या तीव्र भावनाअधिकारी ठराविक ठेकेदारांचीच कामे करतात !

कणकवली , दि. २६ : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलांना रात्री अपरात्री ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. अनेक वेळा तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून सावंतवाड़ी येथे जाण्याचा सल्ला दिला जातो. हे योग्य नव्हे. शासकीय रुग्णालयातील जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. अशा संतप्त भावना गुरुवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यानी व्यक्त केल्या.तसेच आरोग्य सेवे बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


दरम्यान, सभागृहाच्या या संतप्त भावना पत्राद्वारे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच शासनाला कळविण्यात याव्यात असे या सभेत ठरविण्यात आले. तसेच पंचायत समितीच्या पुढील सभेपर्यन्त या समस्येवर तोडगा न निघाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाच्यावतीने भेट घेवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरण्याबरोबरच इतर समस्या सोडविण्याची मागणी करण्याचे ठरविण्यात आले. सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनीही याला संमती दिली.


कणकवली पंचायत समितिची मासिक सभा गुरुवारी प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी उपसभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहायक गटविकास अधिकारी वैभव सापळे आदी उपस्थित होते.


या सभेत पंचायत समिती सदस्या सुजाता हळदिवे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती का केली जात नाही ? असा प्रश्न आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. शासकीय रुग्णालयात जर महिलांसाठी प्रसूती सारखी सुविधा तसेच उपचार उपलब्ध होत नसतील तर गोरगरिब जनतेने कुठे जायचे? या उपजिल्हा रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तेथून सावंतवाड़ी अथवा गोवा येथे रुग्णांना हलविण्यास सांगितले जाते.

सध्या महामार्गहि खराब झाला असून त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे फोंडया सारख्या गावातून कणकवली येथे आलेल्या रुग्णांना ओरोस येथे जायचे झाल्यास खूप वेळ लागतो.

या दरम्यानच्या कालावधीत उपचाराला विलंब झाल्याने एखादया रुग्णाचे प्राण जावू शकतात. त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, गणेश तांबे , मिलिंद मेस्त्री यांनीही या विषयावर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.


सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी प्रशासनाला सभागृहाच्या या भावना लेखी स्वरुपात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच शासनाला कळवाव्यात असे सांगितले. तसेच पुढील सभेपर्यन्त या समस्येबाबत कार्यवाही न झाल्यास शिष्टमंडळ घेवून जिल्हाधिकाऱ्याना भेटण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

सध्या भात कापणी सुरु असून लेप्टो, डेंग्यूबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी.अशी मागणी मिलींद मेस्त्री यांनी केली. तर अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने ओला दुष्काळ जाहिर करावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी गणेश तांबे यांनी केली. तर लष्करी अळीमुळे भात शेतींचे नुकसान झाले असून त्याचा सर्व्हे कृषि विभागाने केला का? असा प्रश्न मिलिंद मेस्त्री यांनी उपस्थित केला.


तालुक्यात सर्व्हे सुरु असून काही भागातील अहवाल आला आहे. मात्र, अपूर्ण माहिती मुळे तालुक्याचा अहवाल तयार झाला नसल्याची माहिती कृषि विभागाच्यावतीने सभागृहात देण्यात आली. त्यामुळे सदस्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा अहवाल कधी तयार करणार? तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार ? असे प्रश्न त्यानी अधिकाऱ्यांना विचारले.


लवकरच तालुक्यातील नुकसानीचा अहवाल तयार करून जिल्ह्याला पाठविण्यात येईल.असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासनाजवळ करण्याचा ठराव या सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

तालुक्यातील कासार्डे परिसरासह अनेक गावातील रस्ते खडडेमय झाले आहेत. ते कधी दुरुस्त करणार ?असा प्रश्न प्रकाश पारकर यांनी विचारला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नंदकुमार कोरके यांनी या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काम होऊ शकलेले नाही असे सांगितले. त्यामुळे सदस्य संतप्त झाले.


अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, काम काही होत नाही. तर आम्ही काय करायचे ? असा प्रश्न सदस्यांकडून विचारण्यात आला. तर फक्त नियम सांगू नका.रस्ते चांगले होऊ देत. जनता खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे आमच्या भावना शासना पर्यन्त पोहचवा आणि तातडिने निर्णय घ्या.असे सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.


सोनवडे घाट रस्ता नरडवे गावाला जोडण्यात यावा, विजेच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, कनेडी हायस्कूल येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावेत, ऑनलाईन सातबारा देण्यातील अडचणी तत्काळ दूर करण्यात याव्यात अशा विविध मागण्या यावेळी मंगेश सावंत, सुभाष सावंत,सुजात हळदिवे यांच्यासह अन्य सदस्यानी या सभेत केल्या. तर कृषि अधिकारी सुभाष पवार यांनी विविध कृषि योजनांची माहिती सभागृहात दिली. ताड़पत्री तसेच इतर साहित्य वाटप करण्यासाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत असे सुभाष पवार यांनी सांगितले.

अधिकारी ठराविक ठेकेदारांचीच कामे करतात !

लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तालुक्यातील ठराविक ठेकेदारांचीच कामे करतात.असा आरोप गणेश तांबे यांनी बंधाऱ्यांच्या कामाविषयी बोलताना केला. तसेच त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.मात्र, शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने आराखड्यात घेतलेली सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे सदस्यानी कृपया गैरसमज करून घेऊ नये.असे लघु पाटबंधारे विभागाचे हवालदार यानी यावेळी सांगितले. तर या विषयासाठी आपण स्वतंत्र बैठक घेवून कामांचा आढावा घेवू असे सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले.
 

Web Title:  Members of the government hospital in Kanakwali are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.