Malawi tourists blossom, thousands of crowds, Sindhudurg coastline tops the list | मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

- महेश सरनाईक 
सिंधुदुर्ग - सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस शेकडो वाहनांनी मालवण व्यापून गेलेय. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवत आहे.
समुद्रकाठचे पर्यटन आता देशभरासह परदेशातही आघाडीवर आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर प्रत्येक बिच लोभसवाणे आहे. त्यामुळे या भागात एकदा आलेला पर्यटक आपण स्वतःच पुढच्या आपल्या दौऱ्यात आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन यायचं प्लॅन करतो आणि दौऱ्यावर आल्यावर पुढच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते.

तारकर्ली, देवबागाला सर्वाधिक पसंती
पर्यटनात मालवणचे नाव घेतलं की तारकर्ली आणि देवबाग या जोडगोळीचे नाव पुढे येणारच. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटक निवास बांधले आहेत. तर स्थानिक तरुण आणि उद्योजकांनी घर तेथे जेवण, राहण्याची व्यवस्था करत पर्यटकांसाठी कमी पैसात समुद्र सान्निध्यात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पर्यटक या भागाला पसंती देत आहेत.

ऑनलाईन बुकिंगला पसंती
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे. अचानक मालवणच्या दौऱ्याचा बेत आखाला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे.

पर्यटन वाढले, अपेक्षाही वाढल्या
फेसाळणाऱ्या लाटा आणि नयनरम्य किनारा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी मालवण किनारपट्टीवर भेट देत आहेत. सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओढा विचारात घेता स्थानिकांनी शासनाच्या योजनांची वाट न बघता पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीवर भर देत पदरचे पैसे घालून मोठ्या दिलाने पर्यटन व्यवसाय उभा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षाही वाढल्या.

सिंधुदुर्ग पर्यटनाची पंढरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वेगळाच आनंद देऊन जाते. येथे असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृती, लोककला आदींची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. पर्यटकांना नानातऱ्हेचे साहसी खेळ उपलब्ध करून स्थानिकांनी पर्यटकांशी नाते निर्माण केले. यातूनच दरवर्षी पर्यटन बहरत आहे. पर्यटकांनी मालवणसह, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्याला पसंती दिल्याने पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम क्रमांकांचा जिल्हा ठरत आहे.