Lok Sabha Election 2019 : स्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:34 AM2019-03-25T11:34:45+5:302019-03-25T11:36:58+5:30

कणकवली तालुक्यातील मतदारांनी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंची पाठराखण केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखण्याचा विक्रम नोंदविण्यास काँग्रेसला मदत केली होती.

Lok Sabha Election 2019 Challenge of Fulfilling Swabhiman Party! | Lok Sabha Election 2019 : स्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!

Lok Sabha Election 2019 : स्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!

Next
ठळक मुद्देस्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!लोकसभा निवडणूक : कणकवली तालुक्यातील स्थिती

सुधीर राणे 

कणकवली : कणकवली तालुक्यातील मतदारांनी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंची पाठराखण केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखण्याचा विक्रम नोंदविण्यास काँग्रेसला मदत केली होती.

सलग चौथ्यांदा कणकवलीत काँग्रेसने आपले एकहाती वर्चस्व राखून शिवसेना, भाजपला चांगलाच धक्का दिला होता. आता नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या नवीन पक्षासमोर लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीसारखेच मताधिक्य राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या विधानसभा निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसचेच वर्चस्व कायम राहील अशी अटकळ बांधली जात होती.

त्यामुळे त्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजप स्वतंत्र लढत असले तरी तालुक्यात काँग्रेसला रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १८ जागांवर छुपी युती करण्यात आली होती. शिवसेना-भाजपच्या या रणनीतीमुळे काँग्रेसला त्या निवडणुकीत जोरदार धक्का बसेल अशीही चर्चा होती. मात्र काँग्रेसने तालुक्यातील आठही जिल्हा परिषद मतदारसंघात पंधराशे ते साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळविले होते.

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात ६३९ चे मताधिक्य काँग्रेसला मिळाले होते. तर खारेपाटण जिल्हापरिषद मतदारसंघात २२८१, कासार्डेत १५२८, जानवलीत १३९४, फोंडाघाट ९९०, हरकुळ बुद्रुक १३९१, कलमठमध्ये १४७९चे मताधिक्य काँग्रेस उमेदवारांना मिळाले होते.

खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसला ३८ तर कासार्डे पंचायत समिती मतदारसंघात ८५ मतांनी विजय मिळाला होता. हे मतदारसंघ वगळता तळेरे पंचायत समिती मतदारसंघात १६१९, नांदगाव ४००, जानवली ७८७, बिडवाडी ७४०, लोरे ८८९, फोंडा १९४, हरकुळ खुर्द २९०, हरकुळ बुद्रुक १०२८, वरवडे १४८१, कलमठ ३८५ , कळसुली ३५६, ओसरगाव ४३१, नाटळ १३३९ आणि नरडवे पंचायत समिती मतदारसंघात १०३३ चे मताधिक्य मिळाले होते.

विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ हजार ८९ चे मताधिक्य मिळाले होते.
तर जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या श्रीया सावंत १३९४ एवढ्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात विजयी झालेले काँग्रेसचे संजय आंग्रे यांना ३६४० मते मिळाली होती.

हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राजलक्ष्मी डिचवलकर यांनी १३९१ चे मताधिक्य घेत विजय मिळविला होता. तर हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघातून भिरवंडेचे माजी सरपंच मंगेश सावंत यांनी काँग्रेसकडून लढताना २९० चे मताधिक्य मिळविले होते.

स्वाभिमान पक्ष ग्रामीण भागात पहिल्यांदाच निवडणुकीत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता काँग्रेसमधून बाहेर पडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आता नवीन पक्षासोबत आहेत. असे जरी असले तरी काँग्रेसची पारंपरिक मते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मिळावीत यासाठी त्या पक्षातील नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसचे असलेले मतदार त्या उमेदवारालाच मतदान करतील हे निश्चित आहे.

चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आव्हान

कणकवली तालुक्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पर्यायाने निलेश राणे यांना मताधिक्य मिळावे यासाठी तसेच नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे हे मोठे आव्हान त्या पक्षासमोर उभे ठाकले आहे. कणकवली तालुक्यातील मागील निवडणुकीच्या वेळची राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांनी शिवसेना, भाजप पक्षात प्रवेश केले आहेत. त्यांची मदत त्या पक्षांना या निवडणुकीत होणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Challenge of Fulfilling Swabhiman Party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.