Inspector Deepak Kesarkar inspected the Atra, Jamdul flood affected area of ​​Sindhudurg district | दीपक केसरकर यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा, जामडूल पूरग्रस्त भागाची पाहणी

ठळक मुद्देउधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणीआचरा दौरा : महसुल विभाग अधिकारी अनुपस्थितीतकेसरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीला भेट दिली

आचरा : उधाणामुळे आचरा, जामडूल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी बुधवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे जामडूल बेटास सरंक्षण बंधारा देण्याची मागणी केली. तर आचरा माजी सरपंच टेमकर यांनी जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी नळपाणी योजनेस लोकसंख्येच्या निकषावर मंजूर झालेला निधी अपुरा असल्याचे सांगत इस्टिमेटच्या आधारे अधिकचा निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली.

नुकसानग्रस्तांची झालेल्या नुकसानीची पंचयादी घालण्याच्या पालकमंत्री यांनी यावेळी सुचना दिल्या. मात्र पालकमंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात महसुलच्या कोतवालाव्यतिरिक्त कोणताही महसूल अधिकारी उपस्थित नव्हता.


आचरा जामडूल येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत खासदार विनायक राऊन, आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुक बबन शिंदे, जान्हवी सावंत, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मालवण नगरसेवक नितीन वाळके, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, उदय दुखंडे, चिंदर उपसरपंच अनिल गावकण, बाबी जोगी व अन्य शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.


जामडूल येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीला भेट देत आचरा सरपंच चंदन पांगे यांच्याशी पूर परिस्थितीवर चर्चा केली.

यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी जामडूल, पिरावाडी व हिर्लेवाडी भागासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर झालेला ४२ लाखाच्या निधीतून भौगोलिक परिस्थिती पाहत नळपाणी योजना पूर्ण होणारी नसून लोकवस्तीच्या निकषावर मंजूर झालेला निधी हा अपुरा असून जामडूल वासीयांची पाण्याची गरज पूर्ण करावयाची असल्यास आचरा हिर्लेवाडी ते जामडूल नळपाणी योजनेचे भौगोलिक इस्टीमेट तयार करुन अंदाजित दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्याची मागणी आचरा माजी सरपंच टेमकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली.


आचरा जामडूलमध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी नुकसानीचा पंचनामा करुन घेण्याच्या सूचनाही केल्या. मात्र पालकमंत्र्यांच्या आचरा दौऱ्यात महसुलच्यावतीने आचरा तलाठी कार्यालयातील कोतवाल सोडल्यास कोणीही हजर नसल्याचे समोर आले.