मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची थडगी बांधण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारा- परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:38 AM2018-11-19T11:38:11+5:302018-11-19T11:40:06+5:30

पालकमंत्र्यांनी ३७ कोटींचा निधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी  मंजूर झाल्याची घोषणा केली आहे. मात्र, जिल्ह्यात  वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय रूग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे.

Improve health care system rather than building a wall of multispecialty hospital - Parashuram Upkar | मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची थडगी बांधण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारा- परशुराम उपरकर

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची थडगी बांधण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारा- परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सक भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू; अनेक गोष्टींमध्ये गैरव्यवहार केल्याचे प्रकारणपालकमंत्र्यांचा धाकच  नाही !

कणकवली  :पालकमंत्र्यांनी ३७ कोटींचा निधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी  मंजूर झाल्याची घोषणा केली आहे. मात्र, जिल्ह्यात  वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय रूग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी आरोग्य सेवेचा बोजवारा वाजल्याचे चित्र आहे.त्यामुळे  नवीन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यापेक्षा असलेल्या ग्रामीण व जिल्हा रूग्णालयात सेवा सुधारण्याची गरज आहे़ केवळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची थडगी बांधून ठेवण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारा, असा उपरोधक टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.

        परशुराम उपरकर पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक कुडाळमध्ये मल्टिस्पेशालिटी तर पालकमंत्री अन्य कुठेतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करत आहेत. परंतू जिल्हा रूग्णालयाच्या  झालेल्या दुरावस्थेकडे या लोकप्रतिनिधींचे लक्ष राहिलेले नाही़. जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य सेवेचे काम करायचे सोडून ज्या  ठिकाणी पैसे मिळतील ती कामे करू लागले आहेत.  यापूर्वी जिल्हा शल्य चिकीत्सकानी  ज्या ज्या ठिकाणी सेवा बजावली त्या-त्या ठिकाणी त्यांच्या विविध प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

         जिल्हा रूग्णालयात ४० लाख गुंतवणुक करून उभारण्यात आलेले ब्लड टेस्टिंग युनिट बंद आहे. त्या युनिटचा वापर न करताच काही खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी रूग्णांना पाठविले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना आर्थिक भुर्दंड पडत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी यावेळी  केला.

  'ब्लड आॅन कॉल' साठी बेरोजगार मजूर संस्थेची नेमणूक नियमबाह्यरित्या  करण्यात आली आहे. या संस्थेत काम करणाऱ्या  मजूरांना कोणतीही तांत्रीक माहिती नसते. केवळ टक्केवारी मिळविण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयातील उपहारगृहाबाबत अशीच भूमिका जिल्हा शल्य चिकित्सकांची आहे.

       आर्थिक मागणी पुर्ण न केल्यामुळे त्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तसेच कोणताही निधी आला नसताना दुरूस्ती करण्यासाठी कॅन्टीन खाली करण्याचे आदेश देवून  जिल्हा शल्य चिकित्सकांनी पैसे लाटण्यासाठी कॅटिंन चालकावर  दबाव टाकला आहे. अपंग व फिटनेस प्रमाणपत्रासाठी  आलेल्या उमेदवारांकडून दोन हजार ते पाच हजार रूपयांपर्यंत मागणी केली जात असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

         ते पुढे म्हणाले,  जिल्हा रूग्णालयात घाणीचे साम्राज्य असून आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. या ठिकाणी आलेल्या रूग्णांना कोल्हापूर किंवा गोवा या ठिकाणी पाठविण्यात येते. जिल्हा शल्य चिकीत्सकांची भेट घ्यायला आम्ही  गेल्यानंतर रूग्णालयाच्या दारावर दोन रूणांना कोल्हापूर येथे पाठविण्यात येत होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारणा केली असता त्या ठिकाणी उपचार करण्यात आले. खाजगी डॉक्टर 'एनआरएचएम' खाली रुग्ण सेवा देत आहेत. फक्त रूग्णांची दिशाभूल करून जिल्ह्यातील शासकीय रूग्णालये पोस्टमनची कामगिरी करत असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्र्यांचा धाकच  नाही !

पालकमंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना जिल्हा शल्य चिकित्सक शनिवारची सुट्टी टाकून गावी जातात. तसेच ते आता सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत येतील. त्यांच्याप्रमाणेच  अनेक अधिकारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब असतात. प्रशासनावर पालकमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील जनतेवर  ही दुर्दैवी परिस्थिती आलेली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा करणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Improve health care system rather than building a wall of multispecialty hospital - Parashuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.