परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:57 PM2018-06-25T17:57:38+5:302018-06-25T18:07:24+5:30

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तनया रवींद्र दळवीने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे.

IAS to be fought against the situation | परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस

परिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस

Next
ठळक मुद्देमोबाईल वापरतच नाही, खासगी शिकवण्यांना न जाता शाळेसह घरातच अभ्यासआई, वडील, आजीच्या परिश्रमाची जाणीव राखली

प्रकाश वराडकर

रत्नागिरी : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. लहानपणी आंब्याचा किरकोळ व्यवसाय व वडापाव विक्रीच्या दुकानावर तिच्या परिवाराचा चरितार्थ व्हायचा. आई, वडील व आजी जीवतोड मेहनत करायचे. गेल्या चार वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथे भाड्याच्या जागेत वडिलांनी छोटेसे भोजनालय सुरू केलेय. त्यावरच तिचे कुटुंब चाललेय. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आई, वडील व आजीच्या पाठिंब्यावर तिने दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिला पुढे आयएएस अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे.

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील श्रीनगर येथे राहणाऱ्या या गुणवंत मुलीचे नाव तनया रवींद्र दळवी असे आहे. सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल, रवींद्रनगर, कारवांचीवाडी येथे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. या शिक्षणाच्या कालावधीत तिने खासगी शिकवण्यांना कधीच जवळ केले नाही. सर्व अभ्यास शाळेत आणि घरी व्हायचा. घरी आल्यानंतर ती सातत्याने पुस्तकांचे वाचन, गणिताचा सराव करायची. दहावीचा अभ्यास करताना ती टी. व्ही. क्वचितच पाहायची. संपर्कासाठी साधा मोबाईल तिच्याजवळ होता.

त्याव्यतिरिक्त अभ्यासासाठी गुगलवरून काही माहिती हवी असेल तेव्हाच फक्त ती आईच्या मोबाईलचा वापर करायची. दहावीचा अभ्यास करताना तिचा दिनक्रम ठरलेला होता. पहाटे ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दररोज वाचन, अभ्यास, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा, दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अभ्यास, सायंकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत पुन्हा अभ्यास असे तिचे दिवसाचे वेळापत्रक होते.

त्यात कधीतरी परिस्थितीनुसार बदलही व्हायचा. तनयाचे बाबा रवींद्र तिला गणिताच्या अभ्यासात मदत करायचे तर आई नेहा मराठी विषयाच्या अभ्यासात मदत करायची. शिक्षकांचे तर तिला सदैव सहकार्य असायचे. तिचा भाऊ साहील हा यावर्षी दहावी इयत्तेत आहे. तनयाने दहावीच्या परीक्षेत गणित व विज्ञान विषयांमध्ये प्रत्येकी ९६, समाजशास्त्रमध्ये ९७, मराठीमध्ये ८७, इंग्रजीमध्ये ८४ तर हिंदीमध्ये ९३ गुण मिळवले आहेत.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी आई, वडील व आजी किती परिश्रम घ्यायचे, याची जाणीव तनयाला आहे. अभ्यासाबरोबरच तनया स्वयंपाक कलेतही तरबेज आहे. सातवी इयत्तेत असताना तिला शिष्यवृत्तीही मिळाली होती. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतही ती गुणवत्ता यादीत आली होती. दहावीनंतर गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिला विज्ञान शाखेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तसेच आयएएससाठीही अभ्यास करायचा आहे.

भोजनालयात चपात्या बनवण्यातही मास्टर

नववीपर्यंत आणि पुढे दहावीचे शिक्षण सुरू असतानाही तनया आपल्या अभ्यासाबरोबरच घरच्या कामातही मदत करायची. आई, वडील भोजनालयात गेलेले असताना घरातील स्वयंपाक ती करायची व आजही करते. कधी भोजनालयात जावे लागले तर जात असे व तेथे चपात्या लाटून त्या भाजण्याचेही काम करायची तर कधी कॅश काऊंटर सांभाळायची. आईची प्रकृती ठीक नसताना सातत्याने दोन महिने तिला भोजनालयात जावे लागले. तरीही तिचे आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष होते.
 

Web Title: IAS to be fought against the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.