महामार्ग प्रकल्पग्रस्तांना ३१ मे पर्यंत न्याय द्या, अधिकाऱ्यांना डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:21 PM2019-05-16T17:21:36+5:302019-05-16T17:26:05+5:30

३१ मे पर्यंत महामार्ग चौपदरीकरणाबाबतचे सर्व प्रश्न सोडवा. अन्यथा आम्ही काम बंद पाडू. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मग ,आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. अशा शब्दात कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

Give justice to highway project affected people till May 31, deadlines to officials | महामार्ग प्रकल्पग्रस्तांना ३१ मे पर्यंत न्याय द्या, अधिकाऱ्यांना डेडलाईन

 कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, प्रकाश शेडेकर यांच्याशी संदेश पारकर, वैभव नाईक तसेच अन्य पदाधिकाऱ्यानी व प्रकल्पग्रस्तांनी चर्चा केली. भर उन्हात महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

Next
ठळक मुद्देमहामार्ग प्रकल्पग्रस्तांना ३१ मे पर्यंत न्याय द्याअन्यथा काम बंद पाडणार ; पारकर , नाईक यांनी दिली अधिकाऱ्यांना डेडलाईन

कणकवली: मुंबई -गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्या . २०१६ पासून आता पर्यंत जनतेने प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यामुळे आता त्यांचा अंत पाहू नका. आता या विषयावर चर्चा खूप झाली . ३१ मे पर्यंत महामार्ग चौपदरीकरणाबाबतचे सर्व प्रश्न सोडवा. अन्यथा आम्ही काम बंद पाडू. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मग ,आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. अशा शब्दात कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संदेश पारकर , वैभव नाईक , शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांसह कणकवली येथील प्रांत कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, रविंद्र शेट्ये, बबलू सावंत, रमेश पावसकर, सुदाम तेली, गीतेश कडू, बबली राणे, कन्हैया पारकर, अवधूत मालणकर , राजन वराडकर , गौरव हर्णे, रीमेश चव्हाण , राजू राठोड , बाळू मेस्त्री , परशुराम झगडे, प्रज्ञा ढवण आदी उपस्थित होते.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उपअभियंता प्रकाश शेडेकर, तहसीलदार संजय पावसकर, शिरस्तेदार आर.जे. पवार , दिलीप बिल्डकॉनचे रविकुमारही उपस्थित होते . त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळीही दाखल झाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अगोदर वेळ जाहीर करूनही बैठकीला वेळेत उपस्थित राहिले नव्हते. तर प्रांताधिकारीही कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात दाखल होऊन खूप वेळ झाल्याने प्रकल्पग्रस्त तसेच कार्यकर्ते संतप्त झाले.त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

त्यांनतर काही वेळाने कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उपअभियंता प्रकाश शेडेकर दाखल झाले. ते प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात येताच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि कणकवली शहरातील वाहतूक कोंडी आदी समस्यांवर आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांनी भर उन्हातच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांनतर काही वेळाने प्रांत कार्यालयात बैठक सुरू झाली.
यावेळी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कार्यपध्द्तीबाबत प्रकल्पग्रस्त आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांची बदली करा अशी मागणी केली.

एक एक वर्ष बंद असलेले पथदीप , वाहतूक कोंडी, निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था , तुटलेली बीएसएनएलची लाईन, तुटलेली नळ पाणी पाइपलाईन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक पुतळा, श्रीधर नाईक उद्यान आदी विषयांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

पावसाळ्यात कणकवलीत ड्रेनेज तुंबणार

असून दुकान आणि घरात गटाराचे पाणी जाणार असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी १९ मे पर्यंत कणकवली, झाराप ते कुडाळ पर्यंतचे पथदीप सुरू करणार असल्याचे बनगोसावी यांनी सांगितले.
पत्र्याचे बॅरॅकेट्स सोडून दोन्ही बाजूला १० मीटर रस्ता असल्याचे दाखवून द्या. असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या आक्रमकतेनंतर तात्पुरता सर्व्हिस रोड ५ ऐवजी ७ मीटरचा करण्याचे मान्य करण्यात आले. कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाची नुकसानभरपाई नगरपंचायतीला न देताच उद्यान तोडल्याची बाब चर्चेदरम्यान समोर आली. त्यामुळे संदेश पारकर व वैभव नाईक संतप्त झाले.

गांगो मंदिर येथे अंडरपास देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच हळवल आणि तरंदळे फाट्याचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. जानवली गावात ४५ मीटर रुंद जमीन भूसंपादित करायची आहे. असे असताना ४५ मीटरच्या बाहेर दुतर्फा ३ मीटर सर्व्हे का करता ?  असा प्रश्न प्रशांत राणे, रंजन राणे , भालचंद्र दळवी यांनी विचारला. तर वागदेतील बदललेल्या वॉटर फ्लो वरून प्रज्ञा ढवण आक्रमक झाल्या होत्या. यावेळी संबधित ठिकाणी पाहणी करून निर्णय घेण्यात येईल असे बनगोसावी यांनी सांगितले.

ओसरगावमध्ये संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीची मोबदला नोटिसच दिली नसल्याचे यावेळी बबली राणे यांनी उघड केले. ती दिल्यानंतरच तेथील काम सुरू करा.असे पारकर यांनी सांगितले. तसेच कसाल हायस्कुलला महामार्ग ऍप्रोच होत आहे. तेथील विद्यार्थ्यांना ये - जा करण्यासाठी रस्त्याची सोय करा. हायस्कुलमधील दीड हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामळे
ओसरगाव फाट्यावर सर्कल तयार करा. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

१३ एप्रिलला दिल्लीत पाठवलेल्या प्रस्तावाचे पुढे काय झाले ? असा प्रश्न ओसरगाव सरपंच प्रमोद कावले यांनी विचारला. त्यावरही अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. खारेपाटण, तळेरे, कासार्डे, नांदगाव , हुंबरठ आदी भागातील विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.


सिंधुदुर्गातील गाड्या टोल भरणार नाहीत...!

महामार्ग चौपदरीकरणामध्ये बांदा आणि ओसरगाव येथे टोलनाक्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी सिंधुदुर्गातील वाहनांना टोल बसवणार काय ? असा प्रश्न पारकर यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारला. तसेच जिल्ह्यातील वाहनचालक काही झाले तरी टोल देणार नाहीत. असे संदेश पारकर यांनी यावेळी ठणकावले.

आधी जोडरस्ते बनवा ,त्यानंतरच फ्लायओव्हर करा !

कुडाळमध्ये फ्लायओव्हर करताना आधी जोडरस्त्याची तरतूद करा. कणकवलीसारखा खेळखंडोबा कुडाळमध्ये करू नका. असे यावरली आमदार वैभव नाईक यांनी कार्यकारी अभियंत्यांना ठणकावले.तसेच नळयोजना , टेलिफोन , पथदीप आदी प्रश्नांची आधीच काळजी घेण्यात यावी. अन्यथा कुडाळची जनता रस्त्यावर उतरेल असेही आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

उपअभियंता शेडेकर यांना धक्काबुक्की!

शिवसेना -भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले असताना प्रांत कार्यालय आवारात कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर दाखल झाले. त्यांना पाहताच कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले. ' एक दो... एक दो.. बिल्डकॉन को फेक दो ' , 'जमीन आमच्या हक्काची...नाही कुणाच्या बापाची ' अशा घोषणा देत महामार्ग ठेकेदार आणि उपभियंता शेडेकर यांच्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. प्रांत कार्यालयाबाहेरच बनगोसावी आणि शेडेकर याना आंदोलकानी रोखले. तसेच प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
 

Web Title: Give justice to highway project affected people till May 31, deadlines to officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.