ठळक मुद्दे: फेसबुकवरून करायचा युवतीच्या मित्रांशी अश्लील 'चॅट'युवतीच्या तक्रारीवरून युवकावर गुन्हा दाखल

मालवण : मैत्रीचा गैरफायदा घेत आपल्याच मैत्रिणीला फेसबुक मेसेंजरवरून अश्लील संदेश पाठवणे युवकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार किरण संदिप कोयंडे (वय- २१, रा. दांडी आवार, मालवण) या युवकावर मालवण पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मैत्रिणीने रविवारी रात्री उशिरा पोलिसात किरण याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.


मालवण दांडी आवार येथील किरण कोयंडे याची मालवण शहरातील एका युवतीशी मैत्री होती. या मैत्रीतून त्याने त्या युवतीशी फेसबुक मेसेंजर चॅटिंग द्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. ओळख व गाठीभेटी वाढत गेल्यावर या मैत्रीचा गैरफायदा घेत किरण याने काही महिन्यापुर्वी त्या युवतीच्या मोबाईलमधून फेसबुकचा पासवर्ड घेऊन तिच्या अकाऊंटवरून इतर मित्र-मैत्रिणींना अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली.

आपल्या अकाउंट वरून आक्षेपार्ह मॅसेज येत असल्याची माहिती त्या युवतीला मित्रांद्वारे समजल्यानंतर किरण याचे प्रताप तिच्या लक्षात आले. तिने तात्काळ आपल्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलला. त्यामुळे तो राग मनात ठेवून किरण याने त्या युवतीला फेसबुकवर अश्लील मॅसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.


रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा किरण याने त्या युवतीस अश्लील मॅसेज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर किरण याच्या त्रासाला कंटाळून आपण पोलीस स्थानक गाठले, असे त्या युवतीने पोलिसांना माहिती देताना सांगितले.


युवतीने पोलीस स्थानकात आपली व्यथा पोलिसांसमोर मांडल्यानंतर पोलिसांनी किरण याला स्थानकात आणले होते. त्यानंतर युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण याच्यावर भा.द.वि. कलम ३५४ (ड) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम२०००चे कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास देवगडचे पोलीस निरीक्षक जी.बी. सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.