बागायतदारच तयार करणार हापूसपासून पल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:04 AM2018-06-19T03:04:59+5:302018-06-19T03:04:59+5:30

देवगड हापूस आंबा कॅनिंगला यावर्षी योग्य भाव नसल्याने बहुतांश बागायतदारांनी कॅनिंगचा आंबा पिकवून पडेल कॅन्टींग येथील कल्पक फुड्स प्रॉडक्ट्स यांच्या सहकार्याने आंबा पल्प तयार केला आहे.

The farmer will make Pulp from Hapus | बागायतदारच तयार करणार हापूसपासून पल्प

बागायतदारच तयार करणार हापूसपासून पल्प

देवगड : देवगड हापूस आंबा कॅनिंगला यावर्षी योग्य भाव नसल्याने बहुतांश बागायतदारांनी कॅनिंगचा आंबा पिकवून पडेल कॅन्टींग येथील कल्पक फुड्स प्रॉडक्ट्स यांच्या सहकार्याने आंबा पल्प तयार केला आहे. बागायतदारांनी लाखो टन आंबा पल्प बनविला असून तो विविध बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. तसेच आंबा मोदक, आंबा वडी ही देवगड हापूसपासून बनविलेली उत्पादने बाजारपेठांमध्ये दाखल झाली आहेत.
यावर्षी आंब्याच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन हे मे महिन्यामध्येच होते. यामुळे आंबा कॅनिंग सेंटर १ मे नंतरच तालुक्यामध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला २८ ते ३० रुपये प्रति किलोने कॅनिंगचा आंबा विक्री केंद्रावर घेत होते. मात्र काही दिवसांतच हा दर हळूहळू घसरून १६ रुपये प्रतिकिलोवर आल्याने बागायतदारांनी आंबा कॅनिंगला देण्याचे बंद केले. हा दर परवडत नसल्याने बागायतदारांनी आंबा पल्प तयार करण्याची शक्कल लढविली. याकडे बागायतदार वळू लागले. पडेल कॅन्टींग येथे सचिन देवधर यांचे कल्पक फुड्स प्रॉडक्ट्स आंबा पल्प प्रक्रिया उद्योग केंद्र आहे. या ठिकाणी पिका आंबा देऊन बाटली व पॅकबंद डब्यामध्ये दोन वर्षे टिकू शकेल असा आंबा पल्प तयार केला जातो. पाचशे मिलीमीटरच्या एका बाटलीतील आंबा पल्प रसाला ४० रुपये प्रक्रिया करण्यासाठी घेतले जातात. आणि ही ५०० मिलीची आंबा पल्पची बाटली बाजारपेठांमध्ये १५० रुपयांना विकली जात आहे.
देवगड हापूसचा पल्प अतिशय चवदार व टिकाऊ असल्याने त्याच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पडेल कॅन्टींग येथील आंबा पल्प उद्योग केंद्रात हजारो टन आंबा पल्प बनविण्यासाठी दाखल झाला आहे. तसेच तालुक्यातील काही बागायतदार आपल्या घरातही आंब्यावरती प्रक्रिया करून पल्प बनवितात. काही वर्षांपूर्वी दलालांवरती अवलंबून राहिलेला देवगडचा बागायतदार आता प्रगतशील होत असून आंबा रसावर प्रक्रिया करून आंबा मोदक, आंबावडी, पल्प यासारखे पदार्थ बनवून आपली वाटचाल आंबा उद्योजक म्हणून करून आर्थिक उन्नती साधत आहे. तालुक्यातील काही बचतगटही आंबा व्यवसायाला अनुसरून लघुउद्योग करीत असल्याने देवगड हापूसची ख्याती आंब्यापुरती मर्यादित न राहता त्याच्यापासून तयार केलेल्या आंबा पल्प, आंबा मोदक, आंबा वडी अशी व्यापक होते आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही उत्पादने निर्यात केले जातील, असा विश्वास बागायतदारांमधून व्यक्त केला.
>बाहेरून येणाऱ्या पल्पला लागणार लगाम
देवगड तालुक्यातील बहुतांश बागायतदारांनी शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा कॅनिंगला न देता पल्प तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग केंद्रामध्ये दिला होता. प्रक्रिया करून तयार केलेला पल्प स्थानिक बाजारपेठांसहीत महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे. यामुळे कॅनिंगला आंबा देण्यापेक्षा चारपटीने आंबा पल्प तयार करून विक्री केल्याचा फायदा आज बागायतदारांना होत आहे. पूर्वी आंबा पल्प हा कर्नाटक, मद्रास येथून विक्रीसाठी महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमध्ये विशेष करून देवगडमध्ये दाखल होत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून देवगड तालुक्यामध्ये आंबा पल्प तयार केला जात असल्याने बाहेरुन येणाºया आंबा पल्पला लगाम लागून देवगड हापूस आंबा पल्पला आज विविध ठिकाणांहून मागणी केली जात आहे.

Web Title: The farmer will make Pulp from Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.