विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच, देवगड आमसभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:26 PM2018-09-01T14:26:44+5:302018-09-01T14:30:40+5:30

विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा विरोधाचा महत्त्वपूर्ण ठराव देवगडचा आमसभेत घेण्यात आला.

Disagreeable Refinery Project | विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच, देवगड आमसभेत ठराव

देवगडच्या आमसभेत आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले.(छाया:वैभव केळकर)

googlenewsNext
ठळक मुद्देविनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच, देवगड आमसभेत ठरावकोणतीही चर्चा करायला न देण्याची नीतेश राणेंची भूमिका

देवगड : विनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा विरोधाचा महत्त्वपूर्ण ठराव देवगडचा आमसभेत घेण्यात आला. हा प्रकल्प देवगडमध्ये नकोच याबाबत कोणाशीही चर्चा करायला देणार नाही अशी भूमिका आमदार नीतेश राणे यांनी मांडली. आमसभेत दूरसंचारच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून निषेधाचा ठराव घेण्यात आला.

देवगड पंचायत समितीची आमसभा राणे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, बांधकाम सभापती साटविलकर, देवगड सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवरूखकर, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, देवगड पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे, विजयदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

आमसभेत गिर्ये रामेश्वर येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत रामेश्वर सरपंच विनोद सुके, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर, रामेश्वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर व रिफायनरी विरोधकांनी प्रकल्पाच्या विरोधाबाबत तीव्र भूमिका मांडली.

या प्रकल्पामुळे या भागातील जनता विस्थापित होणार असून हा विनाशकारी प्रकल्प नकोच असेही त्यांनी ठणकावून सांगितले. नीतेश राणे यांनीही हीच भूमिका मांडून या प्रकल्पाबाबत आता कोणाशीही चर्चा करायची नसून हा प्रकल्पच नको या प्रकल्पाच्या विरोधाचा ठराव अध्यक्षस्थानावरून मांडला.

माजी आमदार अजित गोगटे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत कंपनी, पर्यावरणाचे अधिकारी व त्या भागातील ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा व्हावी अशी सूचना मांडली. मात्र त्यांच्या सुचनेला गिर्ये, रामेश्वर भागातील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. आम्हाला कोणतीही चर्चा करायची नसून रिफायनरी प्रकल्पच आम्हाला येथे नको अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.

शिधापत्रिकेवर नाव दाखल करण्यासाठी असलेली उत्पन्नाचा दाखल्याची अट रद्द करावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केली. जामसंडे पिरवाडी येथील नागेश बांदकर यांच्या घरी लग्नसमारंभावेळी फक्त त्यांचा घरातील विद्युतपुरवठा बंद करणाऱ्या वायरमनवर कारवाई करावी अशी सूचना शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी मांडली.

पडेल पंचक्रोशीतील गावांना जामसंडे सबस्टेशनवरून वीजपुरवठा करावा अशी सूचना पडेल सरपंच विकास दिक्षीत यांनी मांडली. ग्रामपंचायत संगणक आॅपरेटर्सना पगार वेळेवर होत नाही याकडे प्रमोद शेठ यांनी लक्ष वेधले. आनंदवाडी प्रकल्पाला चालना द्यावी, अशी सूचना काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी मांडली.

तिर्लोट येथील सुबय्या साकवाचे काम डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना राणे यांनी बांधकाम विभागाला दिल्या. देवगड पवनउर्जा प्रकल्पाला आप्पा गोगटे यांचे नाव देण्याचा विषय अद्यापही रखडला असून हा देवगडवासीयांचा अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशा सूचना वीज वितरणला दिल्या.

मिठमुंबरी बागवाडी रस्त्याचा विषयावरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तारामुंबरी पुलाचे जोडरस्ते व बागवाडी येथील रस्त्याचा डांबरीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले.

भुसंपादनासहीत रस्ता डांबरीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर होते. रस्ता ५ कोटींमध्ये होऊ शकतो मग भुसंपादनाचे ५ कोटी गेले कुठे? असा सवाल विलास साळसकर यांनी उपस्थित केला. यावेळी प्रशासकीय मान्यतेमध्ये १० कोटी होते मात्र तांत्रिक मान्यतेमध्ये नव्हते. तसा प्रस्वात सादर करणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूरसंचारच्या कारभाराबाबत तीव्र संताप

देवगड तालुक्यात दूरसंचारची सेवा पूर्णपणे खालावली आहे. अशा शब्दात राणे यांनी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात बहुतांशी दूरध्वनी बंद असून मोबाईल सेवेचेही तीनतेरा वाजले आहेत. अनेक तक्रारींचा, समस्येचा पाढा उपस्थित नागरिकांनी वाचला.

गिर्येत अवैध दारूधंद्याना ऊत, पोलिसांचा वरदहस्त

गिर्ये गावातील अवैध दारूधंद्याचा विषय आमसभेत चांगलाच गाजला. पोलीस अवैध दारूधंद्यावर कारवाई करीत नाहीत, असा आरोप गिर्ये सरपंच रूपेश गिरकर यांनी केला. पोलिसच दारूविक्रेत्यांकडून हप्ते घेऊन कारवाई करण्याअगोदर दारू विक्रेत्याला कल्पना देतात असा गंभीर आरोप मुनाफ ठाकूर यांनी केला.

यावेळी दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र तेथील स्थानिकांकडूनही पोलिसांना सहकार्य हवे, असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी यांनी मांडले. यावेळी रिफानयरी विरोधी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यामध्ये जेवढी तत्परता दाखविली तेवढी तत्परता दारूधंद्याविरोधात कारवाई करण्यामध्ये दाखवा अशा स्पष्ट सूचना राणे यांनी पोलिसांना दिल्या.

मग्रारोहयोचा विषय चांगलाच गाजला

मग्रारोहयोच्याा कामांबाबत फक्त फणसगाव, उंडील, विठ्ठलादेवी, गोवळ, वाघिवरे या पाच ग्रामपंचायतीसाठी राजकारण करून कामांची चौकशी करण्यात आली. यामागे राजकीय षड:यंत्र आहे असा आरोप फणसगांव माजी सरपंच उदय पाटील व कृष्णा नर यांनी केला.

मग्रारोहयोच्या देवगड तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करावी, अन्यथा कामे सुरू करू नयेत असा पवित्रा घेतला. मग्रारोहयोबाबत आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घ्यावी अशी सूचना यावेळी संदीप साटम यांनी मांडली.

 

Web Title: Disagreeable Refinery Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.