स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:54 PM2018-06-24T14:54:26+5:302018-06-24T14:54:44+5:30

राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे.

Clean Survey Campaign: Vengurle Municipal Council, eighteen in the country | स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

Next

वेंगुर्ले : राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा तर मालवण नगरपरिषदेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. याबाबतची घोषणा शनिवारी जाहीर झाली असून केंद्र सरकारने देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे झोन तयार केले होते.
यात मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण-दिव या राज्यांचा समावेश होता. त्यातून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
२०१७-१८ मध्ये भारत सरकारच्या स्वच्छता विभागाने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान वेगवेगळ््या नगरपालिका क्षेत्रात घेण्यात आले होते. यात देशातून १४२२ नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. यातून देशातील पहिल्या वीस नगरपालिकांना खास बक्षीस देण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्र सरकारचे प्रतिनिधी येऊन करीत असत. तर विभागीय स्तरावरून मार्गदर्शन केले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण 
या नगरपालिकांनी सहभाग घेतला होता.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेगवेगळे मुद्दे देण्यात आले होते. यात प्रशासकीय कामकाज, लोकांची मते, स्वच्छतेबाबतची जागरूकता आदी मुद्दे यात घेण्यात आले होते. त्यांना गुण देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात येऊन नागरिकांशी थेट चर्चा केली. हे प्रतिनिधी नगरपालिका क्षेत्रात दोन दिवस थांबले होते. त्यांनी कचºयाचे व्यवस्थापन तसेच पालिका राबवित असलेले प्रकल्प आदींची पाहणी केली होती व त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता.
केंद्र सरकारच्या विविध प्रतिनिधींकडून आलेल्या अहवालांनंतर त्यांचे गुणांकन करून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सर्व क्रमांक केंद्र सरकारने वेबसाईटवर टाकले आहेत. यात देशात स्वच्छतेत महाराष्ट्र सरकारचा दुसरा क्रमांक आला आहे. तर स्वच्छतेत देशात महाराष्ट्रातून पाचगणी ही नगरपालिका पहिली आली आहे.
दरम्यान, सन २०१५ ते २०१८ या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ शहर पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार २०१७ व २०१६, फाईव्ह लिव्हज् राष्ट्रीय सन्मान २०१८, कोकण विभागात प्रथम, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट नगरपालिका, हागणदारीमुक्त शहर पुरस्कार असे पुरस्कार मिळविले आहेत. हे सर्व यश नागरिक, स्वच्छता कर्मचारी व दूत, आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
तर सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केले असून, वेंगुर्ले व कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे खास अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारकडून खास गौरव
पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये येण्याचा मान वेंगुर्ले नगरपालिकेने पटकावला असून या नगरपालिकेचा केंद्र सरकारच्यावतीने खास गौरव करण्यात येणार आहे. तर कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा  तर मालवण नगरपालिकेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. हे क्रमांक १४२२ नगरपालिकेतून निवडण्यात आले आहेत.

Web Title: Clean Survey Campaign: Vengurle Municipal Council, eighteen in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.