‘बोटिंग’साठी व्यावसायिकांवर कु-हाड, आरवली-मोचेमाड किना-यावरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 03:49 PM2018-01-21T15:49:48+5:302018-01-21T15:50:02+5:30

एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम  प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे.

Businesses for 'Boating' are available on Kubhad, Aravali-Mokhmad Kahan-type | ‘बोटिंग’साठी व्यावसायिकांवर कु-हाड, आरवली-मोचेमाड किना-यावरील प्रकार

‘बोटिंग’साठी व्यावसायिकांवर कु-हाड, आरवली-मोचेमाड किना-यावरील प्रकार

Next

सावंतवाडी - एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम  प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक व्यावसायिकांनी माजी आमदार राजन तेली यांची भेट घेतली असून भाजप याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.
आरवली येथे गोव्यातील एका उद्योजकाने हॉटेलची उभारणी केली आहे. हे हॉटेल बांधूनही पूर्ण झाले. मात्र अद्यापपर्यंत ते सुरू केले नाही. मात्र या उद्योजकाने प्रशासनापुढे आता नवीनच अट घातली आहे. यात या हॉटेलच्या समोरचा समुद्राचा भाग बोटिंग प्रकल्पासाठी द्यावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी राज्य शासनाकडे केल्यानंतर चार दिवसांपूर्वी प्रशासनाचे सर्व अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच मेरीटाईम व खनिकर्म अधिकारी आरवली-मोचेमाड येथे दाखल झाले व त्यांनी तेथील स्थानिक वाळू व्यावसायिकांची भेट घेऊन तुम्ही तत्काळ येथील वाळू उत्खनन थांबवा, अशी मागणी केली.
मात्र तेथील वाळू व्यावसायिकांनी याला ठामपणे नकार दिला. त्यामुळे हे सर्व अधिकारी आल्या पावली निघून गेले. मात्र अधिकारी निघून गेल्यानंतर येथील वाळू व्यावसायिकांना प्रशासनाच्यावतीने नोटीस पाठविली. यात तातडीने हा भाग खाली करा, असे सांगितले. मात्र अद्याप वाळू व्यावसायिकांनी यावर निर्णय घेतला नाही. व्यावसायिकांनी जी निविदा भरली आहे, तिची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. ७० लाख रुपये भरून हा ठेका घेण्यात आला आहे. यामध्ये अनेकांनी रोजीरोटी मिळावी यासाठी पैसे भरले आहेत. 
यातून सरकारला महसुलापोटी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत. एवढा महसूल देणारी जिल्ह्यातील ही एकमेव खाडी आहे. असे असतानाही एका उद्योजकाच्या बोटिंग प्रकल्पासाठी शेकडो बेरोजगार युवकांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नोटिसीला माजी आमदार राजन तेली यांनी आक्षेप घेतला आहे
जी खाडी सर्वाधिक महसूल देत आहे, अशा ठिकाणी खासगी बोटिंग कशासाठी आणि बोटिंग जर करायचे असेल तर निविदेचा कालावधी अजून दीड महिना असताना आताच त्यांना तेथून विस्थापित करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करीत प्रशासन उद्योजकांसाठी स्थानिकांना बाजूला करीत असेल तर भाजप हे सहन करणार नाही. प्रसंगी आंदोलन उभे करू, असा इशारा तेली यांनी दिला आहे. तर वाळू व्यावसायिकही आक्रमक झाले असून अनेकजण या व्यवसायावर जगत आहेत. त्यांना अचानक नोटीस देऊन बाजूला कसे काय प्रशासन करू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे.
 
जेटीवर जाण्याचे आदेश आमचे नाहीत 
प्रशासनाचे अधिकारी आरवली-मोचेमाड येथे गेले असतील तर आम्हांला याची माहिती नाही. मी प्रांताधिकारी म्हणून कोणताही आदेश दिला नव्हता किंवा कार्यालयाने दिला नव्हता. त्यामुळे हे आदेश कुणाचे मला माहीत नाही, असे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

Web Title: Businesses for 'Boating' are available on Kubhad, Aravali-Mokhmad Kahan-type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.