किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हवाई सफर, पर्यटन व्यावसायिक, राष्ट्रशक्ती संस्थेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:42 PM2018-05-11T12:42:31+5:302018-05-11T12:42:31+5:30

समुद्रातील दुर्ग- किल्ल्यांचे दर्शनही हवाई पाहणीतून घेण्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी मालवण येथे हेलिकॉप्टरद्वारे किल्ले सिंधुदुर्गचे हवाई दर्शन हा उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे.

Air travel for Darshan Sindhudurg, Tourism Professional, Rashtriya Rashtra Yatra initiative | किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हवाई सफर, पर्यटन व्यावसायिक, राष्ट्रशक्ती संस्थेचा पुढाकार

पर्यटकांच्या सेवेत दाखल होणारे हेलिकॉप्टर.

googlenewsNext
ठळक मुद्देकिल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हवाई सफर, पर्यटन व्यावसायिक, राष्ट्रशक्ती संस्थेचा पुढाकार  १९, २0 ला अनुभवता येणार थरार, हेलिकॉप्टर राईड पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेणार

मालवण : समुद्रातील दुर्ग- किल्ल्यांचे दर्शनही हवाई पाहणीतून घेण्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी मालवण येथे हेलिकॉप्टरद्वारे किल्ले सिंधुदुर्गचे हवाई दर्शन हा उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे.

हवाई पर्यटनाचा हा कोकणातील पहिलाच उपक्रम असून पर्यटनाचे केंद्रबिंदू असणाऱ्या मालवणचे पर्यटन आणखी एका उंचीवर पोहोचेल, असा विश्वास पुण्याचे माजी नगरसेवक व हेलिकॉप्टर राईडचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली दारवटकर यांनी व्यक्त केला.

मालवण येथील हॉटेल सागर किनारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर दारवटकर बोलत होते. यावेळी नकुल पार्सेकर, मालवणचे पर्यटन उद्योजक अन्वय प्रभू, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, रुपेश प्रभू, रश्मीन रोगे आदी उपस्थित होते.

या उपक्रमास जलपर्यटन उद्योजक अन्वय प्रभू व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा देत पुढाकार घेतला असून १९ व २० मे रोजी हेलिकॉप्टरद्वारे पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन घेता येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विभागांच्या परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

दारवटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचे हवाई दर्शन घेता यावे यासाठी आपण राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि काही कंपन्यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध करून २९ एप्रिल रोजी सिंहगडावर हवाई दर्शनाचा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने सह्याद्रीच्या पट्ट्यातील गड-किल्ले व समुद्रात असणारे दुर्ग किल्ले यांचेही विहंगम व विलोभनीय दृश्य पर्यटकांना पाहता यावे यासाठी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा विचार आहे.

एरोलीप या कंपनीच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. मालवण शहरातील देऊळवाडा येथे पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेतून हेलिकॉप्टर उड्डाण करणार आहे.

तेथून अडीच किलोमीटर अंतरावरील समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गवर हे हेलिकॉप्टर आठ या अंकाच्या आकारात फेऱ्या मारणार असून त्यातून समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचे विलोभनीय दृश्य पाहण्याचे भाग्य पर्यटकांना लाभणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवराजेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी

पुरातत्त्व खाते व वायरी-भूतनाथ ग्रामपंचायत यांच्या परवानगीने हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याची संधीही पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी नकुल पार्सेकर यांनी सांगितले.

अन्वय प्रभूंकडे जबाबदारी

या उपक्रमाची जबाबदारी अन्वय प्रभू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हेलिकॉप्टर राईडसाठी प्रत्येक पर्यटकामागे ५ हजार ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या राईडसाठी सर्व नियम व अटींचे पालन करण्यात येणार असून पर्यटकाचे वजन, संपूर्ण माहिती व ओळखपत्र या आधारावर बुकिंग करण्यात येणार आहे. पर्यटकांचा प्रतिसाद आणि येथील व्यवस्थापन पाहून दर शनिवार-रविवारी हा उपक्रम राबविण्यात येईल, असे दारवटकर यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग

हेलिकॉप्टरमधून किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी करण्यात येणारा अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. आगामी काळात सिंधुदुर्गातील नयनरम्य सागर किनारे आणि पर्यटनस्थळे हवाई सफरीच्या माध्यमातून पहावयास मिळणार असल्याने पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरणार आहे.
 

Web Title: Air travel for Darshan Sindhudurg, Tourism Professional, Rashtriya Rashtra Yatra initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.