कोरेगावजवळ रेल्वेतून नदीत कोसळून युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:14 AM2018-04-25T00:14:14+5:302018-04-25T00:14:14+5:30

Youth killed by train in river near Koregaon | कोरेगावजवळ रेल्वेतून नदीत कोसळून युवक ठार

कोरेगावजवळ रेल्वेतून नदीत कोसळून युवक ठार

Next


कोरेगाव : धावत्या कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून पाय घसरल्याने उत्तर प्रदेशमधील तरुण कामगार पडला. सुमारे सत्तर फूट उंच रेल्वे पुलावरून खालच्या नदीपात्रातील खडकावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोरेगाव हद्दीत झाला. प्रद्युम रमाशंकर सोनी (वय १९) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, झाशी जिल्ह्यातील करगुणा येथील सोनी कुटुंबीय नोकरीच्या शोधार्थ सांगलीत दाखल झाले होते. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी गावातून प्रद्युम रमाशंकर सोनी याला कामासाठी आणले. तो नातलगांसह काम करत होता. मात्र, त्याचे मन रमले नाही. त्यामुळे चुलत भाऊ राहुल श्रीबलवीर सोनी हा प्रद्युम याला गावी सोडण्यासाठी निघाला होता.

साखळी ओढून रेल्वे थांबविली..
रेल्वेतील इतर प्रवाशांनी राहुलला प्रद्युम खाली पडल्याचे सांगितले. त्याने क्षणाचा विलंब न लावता, संकटकालीन साखळी ओढून रेल्वे थांबविली. गाडी थांबल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती. गर्दीतील काहीजणांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली, त्यानंतर पोलीस कर्मचारी दाखल झाले.
1 मिरजमधून त्यांनी सकाळी कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून प्रवासाला सुरुवात केली. कोरेगाव रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट सुवर्णजयंती एक्स्प्रेसमुळे ही रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली होती. रेल्वेत गरम होत असल्याने ‘बाहेर फिरून येतो,’ असे राहुलला सांगून तो दरवाजासमोर उभा राहिला.
2 दोन्ही एक्सप्रेसचे क्रॉसिंग झाल्यानंतर कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस साताऱ्याकडे निघाली. स्थानकाच्या पुढच्या
बाजूस असलेल्या वसना नदी पुलावर रेल्वे पोहोचताच,
प्रद्युमचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. पुलाखाली खडक असल्याने त्यावर डोके आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला.
3 दरम्यान, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंकीत सातारा रेल्वे दूरक्षेत्राचे कर्मचारी तेथे आले. कोरेगावातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रद्युमचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार भार्गव साखरे तपास करीत आहेत.

Web Title: Youth killed by train in river near Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.