ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण चार गावांची सरपंचपदे रिक्त

कऱ्हाड, दि. १७ :  तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, पश्चिम सुपने, सुपने आदी गावांतील सत्ता कायम राहिली.


कऱ्हाड तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच व सदस्य अशा एकूण ७२३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात अठरा टेबल व सात फेऱ्यातून पार पडलेल्या मतमोजणीतून अनेक गावांत सत्तांतर तर काही ठिकाणी सत्ता कायम राहिल्याचे स्पष्ट झाले.

सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, युवराज पाटील आदींसह निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


चाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या स्थानिक गटात जोरदार लढत झाली.

तालुक्यातील अंधारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाने आपला सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणून झेंडा फडकावला. तर आणे ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत स्थापनेपासून सत्ता अबाधित ठेवणाऱ्या  श्रीरंग देसाई गटाचा धुव्वा करीत माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने आपली सत्ता स्थापन केली.

रेठरे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते गटाने सरपंचपद प्राप्त केले. मात्र, विरोधी गटाचे सदस्य याठिकाणी जास्त निवडून आले. किवळ येथे काँग्रेसच्या सुरेखा साळुंखे सरपंच झाल्या.

याठिकाणी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाने सात जागा जिंकत आमदार बाळासाहेब पाटील गटाला पराभूत केले. गणेशवाडी, कळंत्रेवाडी, वनवासमाची खोडशी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध झाले.