यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास ‘स्वाभिमानी’कडून दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 03:46 PM2018-07-16T15:46:43+5:302018-07-16T15:49:42+5:30

 दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलनास सुरुवात

Swabhimani Shetkari Sanghatana activists pour milk at the memorial of Maharashtra's first Chief Minister late Y.B. Chavan in karad | यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास ‘स्वाभिमानी’कडून दुग्धाभिषेक

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास ‘स्वाभिमानी’कडून दुग्धाभिषेक

Next

कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून आंदोलनाला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे प्रीतिसंगम परिसर दुमदुमून गेला. 

दुग्धव्यवसाय अडचणीत आल्यामुळे दूध उत्पादकाला पाच रुपयांचे थेट अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून राज्यभर दूध दरवाढ आंदोलन सुरू केले आहे. त्याला कराड व सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दूध उत्पादकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मात्र, दूध रस्त्यावर अभवा अन्यत्र ओतू नये तर ते गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांना मोफत वाटावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.

त्याचाच भाग म्हणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर नजीकच असणाऱ्या महादेव मंदिरातही दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर उरलेले दुधाचे कॅन पोलीस बंदोबस्तात शासकीय रिमांडहोम येथे नेण्यात आले व तेथील विद्यार्थ्यांना ते दूध वाटण्यात आले.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राची घडी बसविण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. मात्र, त्याच महाराष्ट्रात शेतकरी राजाला नागविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. या सरकारला सुबुद्धी द्यावी. त्यासाठी आम्ही  यशवंतरावांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक घालून साकडे घातले आहे.
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana activists pour milk at the memorial of Maharashtra's first Chief Minister late Y.B. Chavan in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.