दरोड्याच्या तयारीतील सहाजण जेरबंद, दोघेजण पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:20 PM2019-06-19T16:20:48+5:302019-06-19T16:23:33+5:30

पळशी, ता. खटाव येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीतील सहाजणांना औंध पोलिसांनी जेरबंद केले. हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असून, यातील एकजण अल्पवयीन आहे. तर या घटनेदरम्यान दोघेजण पळून गेले आहेत. या टोळीकडून सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Six of the robbers prepared for the dock escaped, two of them escaped | दरोड्याच्या तयारीतील सहाजण जेरबंद, दोघेजण पळाले

दरोड्याच्या तयारीतील सहाजण जेरबंद, दोघेजण पळाले

Next
ठळक मुद्देदरोड्याच्या तयारीतील सहाजण जेरबंद, दोघेजण पळाले सर्वजण सातारा जिल्'ातील रहिवाशी; औंध पोलिसांची कारवाई

औंध : पळशी, ता. खटाव येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीतील सहाजणांना औंध पोलिसांनी जेरबंद केले. हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असून, यातील एकजण अल्पवयीन आहे. तर या घटनेदरम्यान दोघेजण पळून गेले आहेत. या टोळीकडून सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुसेसावळीवरून पळशीकडे औंध ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एका पेट्रोल पंपापुढे रस्त्याच्या कडेला तीन दुचाकींवर आठ युवक असल्याचे आढळून आले. पोलीस गाडी बाजूला घेऊन त्यांच्याजवळ जाईपर्यंत दोन दुचाकीस्वार निघून गेले. मात्र, एक दुचाकी अडवून तिघा युवकांना पकडण्यात आले.

यावेळी पोलिसांच्या हाती सुमित ऊर्फ युवराज गोविंद जाधव, रणजित महेंद्र जाधव (दोघे रा. वडूज) आणि एक अल्पवयीन युवक हाती लागला. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.

झडती घेतल्यावर त्यांच्याकडे मिरची पूड, कोयता, लोखंडी रॉड मिळून आला. तर पळून गेलेल्या दुचाकीस्वारांसाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यावेळी एक दुचाकी हाती लागली. त्यावरील सागर विलास घाडगे (रा. फलटण), श्रीरंग मारुती जाधव, अरुण शिवाजी बोडरे (दोघे रा. वडूज) यांना पोलिसांनी पकडले.

झडती घेतल्यावर त्यांच्याकडेही मिरची पूड, दोन काळे रुमाल, लाकडी दांडके आढळून आले. त्याचबरोबर दुचाकीवरून पळून गेलेल्या इतर दोघांची आकाश राजू घाडगे व वाठारचा पद्या अशी नावे असल्याची माहिती पकडलेल्या संशयितांनी दिली. दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पकडलेल्यांनी पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपअधीक्षक अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. बडवे, हवालदार प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलिक कटरे, सी. डी. शिंदे, एस. एस. पोळ, पी. टी. यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.


अनेक गुन्हे उघडकीस येणार...

चार दिवसांपूर्वी अंभेरी घाटात एकास लुटून मारहाण करण्यात आली होती. तसेच वाकळवाडी येथे गेले काही दिवस थैमान घालणारी हीच टोळी असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर वडूज, रहिमतपूर, लोणंद, पुणे या ठिकाणी या टोळीने केलेले गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

औंध पोलिसांचे आवाहन...

अंभेरी घाट, शामगाव घाट, तरसवाडी घाट, ताथवडे घाट या ठिकाणी लूटमार झाली असेल व भीतीने कोणी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसेल तर अशा व्यक्तींनी औंध पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. बडवे यांनी केले आहे.
 

Web Title: Six of the robbers prepared for the dock escaped, two of them escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.